‘पॅकेज’ नव्हे संशोधनाला प्राधान्य देणार

By Admin | Updated: June 20, 2014 01:06 IST2014-06-20T01:06:59+5:302014-06-20T01:06:59+5:30

‘आयआयटीत’ प्रवेश घेणे हेच विद्यार्थ्यांसाठी मोठे अग्निदिव्य असते. अतिशय कठीण अशा परीक्षांचा अडथळा पार करीत ‘आयआयटी’त प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्यावर विद्यार्थ्यांचा उत्साह गगनात मावत नाही

Prioritize the 'package' not the research | ‘पॅकेज’ नव्हे संशोधनाला प्राधान्य देणार

‘पॅकेज’ नव्हे संशोधनाला प्राधान्य देणार

अमेय प्रभुणेचा निर्णय : ‘आयआयटी’ नव्हे ‘आयआयएससी’त घेणार प्रवेश
योगेश पांडे नागपूर
‘आयआयटीत’ प्रवेश घेणे हेच विद्यार्थ्यांसाठी मोठे अग्निदिव्य असते. अतिशय कठीण अशा परीक्षांचा अडथळा पार करीत ‘आयआयटी’त प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्यावर विद्यार्थ्यांचा उत्साह गगनात मावत नाही. ‘आयआयटी’चा ‘ब्रॅन्ड’ नावामागे लागेल या विचारानेच बहुतांश विद्यार्थ्यांना मोठ्या ‘पॅकेज’ची स्वप्नेदेखील पडू लागतात. परंतु जर कोणी ‘आयआयटी’त प्रवेश मिळत असतानादेखील स्वत:चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या मार्गाला जात असेल तर. आजकालच्या काळात अशा प्रकारचा विद्यार्थी सापडणे तसा कठीणच. परंतु शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या अमेय गजानन प्रभुणे या विद्यार्थ्याने ही हिंमत दाखविली आहे. सुरुवातीपासूनच भौतिकशास्त्रात संशोधनाचे स्वप्न उराशी बाळगलेल्या अमेयने ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’मध्ये यश मिळाल्यावर ‘आयआयटी’त न जाता ‘आयआयएससी’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स) येथे प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे.
गुरुवारी जाहीर झालेल्या ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’च्या निकालात अमेय प्रभुणे याला ३६० पैकी २५० गुण मिळाले आहेत. देशस्तरावर त्याचा ४४२ वा क्रमांक आहे. अगदी सहजपणे त्याला ‘आयआयटी’त प्रवेश मिळणे शक्य आहे. परंतु ‘पॅकेज’च्या मागे धावण्याच्या स्पर्धेत धावणे त्याला मान्य नाही. लहानपणापासूनच संशोधनाची आवड असलेला अमेय ‘आयआयएससी’ येथे ‘बी.एस.’मध्ये (बॅचलर आॅफ सायन्स) प्रवेश घेणार आहे व भौतिकशास्त्राच्या सखोल अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणार आहे. ‘क्वॉन्टम थिअरी’मध्ये त्याला विशेष रस आहे. ‘आयआयटी’ला नाकारून ‘बेसिक सायन्स’चे शिक्षण घेण्याच्या त्याच्या निर्णयाचे शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यांनीदेखील कौतुक केले.
आश्चर्याची बाब म्हणजे बारावीत ९५.७ टक्के गुण मिळविणाऱ्या अमेयने ‘बिट्स-पिलानी’च्या प्रवेश परीक्षेत ४५० पैकी ४३१ गुण मिळविले. देशस्तरावर त्याचा प्रथम क्रमांक असण्याचीदेखील शक्यता आहे. परंतु त्याने अकरावीतच ‘आयआयएससी’त प्रवेशासाठी ‘केव्हीपीआय’च्या(किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना) परीक्षेत देशपातळीवर ३० वा क्रमांक मिळविला होता. जगातील नामवंत शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग हे त्याचे प्रेरणास्थान आहेत.
अमेयची आई ‘एलआयसी’त कार्यरत आहेत. मागील वर्षी एप्रिल महिन्यात त्याच्या वडिलांचे अकस्मात निधन झाले. हा मोठा धक्का पचवूनदेखील त्याने हिंमत सोडली नाही व जिद्दीतून वडिलांची स्वप्नपूर्ती केली आहे अशी माहिती त्याच्या शिक्षकांनी दिली.

Web Title: Prioritize the 'package' not the research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.