लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :शिक्षण विभागाने बनावट शिक्षकांच्या नावाने पगार काढण्याच्या घोटाळ्यात नागपूर विभागाचे उपसंचालक उल्हास नरड आणि वेतन विभागाचे अधीक्षक नीलेश वाघमारे यांना निलंबित केल्यानंतर, अनेक मोठे खुलासे होत आहेत. किदवई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकाबाबत तेथील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी गुन्हे शाखेत तक्रार दिली आहे. फौजदारी खटला दाखल असूनही त्यांना मुख्याध्यापक पद देण्यात आल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
किदवई हायस्कूलच्या मुख्याध्यापकांवर शिक्षकांकडून बेकायदेशीरपणे पैसे वसूल करणे, बेकायदेशीर नियुक्ती यासह अनेक आरोपांमध्ये दोषी आढळले असून त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल असूनही, त्यांना त्यांच्या पदावर पुन्हा नियुक्त करण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. ही तक्रार हायस्कूलचे सगीर अहमद, फिरोज खान, मो. असरार, एजाज खान, आयशा तरन्नुम, यास्मीन बानो, स्वालेहा तबस्सुम, असमा खान या शिक्षक कर्मचाऱ्यांनी केली आहे.
शनिवारी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त यांच्याकडे शिक्षण उपसंचालक, सहायक उपसंचालक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी शिक्षा उपनिरीक्षक, जि.प.चे शिक्षणाधिकारी, विभागाचे दोन इतर अधिकाऱ्यांसह किदवई शाळेचे मुख्याध्यापक मजीद पठाण, किदवई एज्युकेशनल अँड कल्चरल सोसायटी आसीनगर टेका संस्थेचे पदाधिकारी वकील परवेज यांच्याविरोधात तक्रार करीत चौकशीची मागणी केली आहे.
शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून खंडणी वसूल करणे, महिला शिक्षिकांशी असभ्य वर्तन करणे यासह विविध प्रकारच्या भ्रष्टाचाराबद्दल मुख्याध्यापक पठाण आणि परवेझ यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. ज्यावर एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली. चौकशीत मुख्याध्यापक पठाण दोषी आढळल्यानंतर त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले. पठाण यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. न्यायालयाने बेकायदेशीर नियुक्त्यांनाही स्थगिती दिली आहे. परंतु हे प्रकरण वादग्रस्त असूनही, शिक्षण विभागाने पठाण यांना बेकायदेशीरपणे पुन्हा या पदावर बसवले.