‘राजकुमार’ला मिळतेयं ‘ली’च्या रूपाने व्हॅलेन्टाईन गिफ्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:08 IST2021-02-14T04:08:47+5:302021-02-14T04:08:47+5:30

फहीम खान नागपूर : १४ फेब्रुवारी हा व्हॅलेन्टाईन डे ! प्रेमीजनांचा खास दिवस ! एकमेकांना गिफ्ट देत व्यक्त होण्याची ...

The 'prince' gets a Valentine's gift in the form of 'Lee'! | ‘राजकुमार’ला मिळतेयं ‘ली’च्या रूपाने व्हॅलेन्टाईन गिफ्ट !

‘राजकुमार’ला मिळतेयं ‘ली’च्या रूपाने व्हॅलेन्टाईन गिफ्ट !

फहीम खान

नागपूर : १४ फेब्रुवारी हा व्हॅलेन्टाईन डे ! प्रेमीजनांचा खास दिवस ! एकमेकांना गिफ्ट देत व्यक्त होण्याची ही खास पर्वणी ! एकाकी आयुष्य घालविणारा ‘राजकुमार’ आणि ‘ली’ यांच्या मनाची घालमेल ओळखत आता गोरेवाडा आंतराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या प्रशासनाने राजकुमारला ‘ली’ गिफ्ट करण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी दिवस निवडला आहे १५ फेब्रुवारीचा ! १४ तारखेला व्हॅलेन्टाईन डे असला तरी या दिवशी कॉलेजला रविवारची सुटी आहे. त्यामुळे प्रेमीजनांचा खरा व्हॅलेन्टाईन सोमवारीच साजरा होणार आहे. राजकुमारच्या नशिबातही असाच योग सोमवारी घडून येतोयं, हा सुद्धा एक योगायोगच !

स्व. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या उद्घाटनापासून येथे पर्यटकांची गर्दी सुरू आहे. येथे आतापर्यंत ‘राजकुमार’ पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र होता. आता सोमवारपासून ‘ली’ वाघिणसुद्धा गोरेवाड्यात दाखल होत आहे. यामुळे ही रुबाबदार जोडी पर्यटकांचे आकर्षण वाढणार आहे.

‘ली’ आतापर्यंत गोरेवाड़ा रेस्क्यू सेंटरमध्ये होती. तर राजकुमार गोरेवाड्यातील प्राणिसंग्रहालयात ! सोमवारपासून ‘ली’ला गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात आणले जाणार आहे. आठवडाभर ती तिथे असेल, त्यानंतर पुढील एक आठवडाभर ‘राजकुमार’ तिथे असेल. या प्रकारे एक आठवड्यासाठी या दोघांना पाळीने मोकळे सोडले जाईल, तर दुसऱ्याला मोकळे ठेवले जाईल. एकदाची दोघांची दोस्ती झाल्यावर एकत्र ठेवले जाणार आहे. साथीदाराच्या विरहात एकाकी आयुष्य घालविणाऱ्यांच्या या मुक्या जीवांच्या मनाची घालमेल अखेर वन विभागाने समजली म्हणायची ! या प्राणिसंग्रहालयात आतापर्यंत सात बिबट ठेवण्यात आले आहेत. यातील तिघांना एक आठवडा मोकळे सोडून नंतर पिंजऱ्यात बंद केले जाते, तर नंतरच्या आठवड्यात चौघांना सोडले जाते. या सोबतच गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पातून आणलेले चार अस्वलही येथे आहेत....

कोट

राजकुमार वाघ आणि ली वाघिण यांना एकत्र ठेवता यावे यासाठी ही प्राथमिक स्तरावरची चाचपणी आहे. यापूर्वी ली आणि राजकुमार या दोघांनाही एकत्र सोडण्याचे ठरले होते. मात्र यापूर्वी एका घटनेत वाघ-वाघिणींच्या लढाईत वाघिण ठार झाली होती. त्यामुळे सावधपणे हा निर्णय घेतला आहे. दोघांनही पाळीपाळीने सोडले जाईल. त्यांच्यात मैत्री झाल्यावरच एकत्र सोडण्याचे ठरले आहे.

- प्रमोद पंचभाई, विभागीय व्यवस्थापक, एफडीसीएम

...

हा कोण ‘राजकुमार’?

राजकुमार नावाचा हा वाघ छत्तीसगडमधील जंगलातून महाराष्ट्रातील तुमसर (भंडारा)च्या जंगल परिसरात पोहचला होता. तो वारंवार लग्न समारंभात शिरायचा, मानवी वस्त्यांमध्ये शिरायचा. त्यामुळे प्रचंड घबराट पसरायची. अखेर वन विभागाने त्याला पकडले. माणसांसोबत असलेली त्याची जवळीक लक्षात घेऊन गोरेवाडा प्राणी उद्यानाच्या जंगल सफारीत त्याचा समावेश करण्याचे ठरविले. त्यानुसार, सफारी सुरू झाल्यापासून तो पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.

...

‘ली’ आहे चंद्रपूरची

चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोनाच्या जंगलात तीन बछडे आपल्या आईपासून भरकटले होते. त्या तिघांनाही महाराजबागेत आणून वाढविण्यात आले. यातीलच एक म्हणजे ‘ली’ आहे. २०१७ च्या दरम्यान तिला गोरेवाडा रेस्क्यू सेंटरकडे सोपविण्यात आले होते. या दरम्यान ‘साहेबराव’ या वाघासोबत राहून लीने चार बछड्यांना जन्म दिला होता. मात्र तान्हुले बछडे तोंडात पकडताना ली चे धारदार दात रुतल्याने एकापाठोपाठ चारही बछडे दगावले. तेव्हापासून ती एकटी आहे.

...

Web Title: The 'prince' gets a Valentine's gift in the form of 'Lee'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.