पंतप्रधान नरेंद्र मोदींची संघ स्मृती मंदिराला भेट; नववर्षाच्या प्रारंभी आद्य सरसंघचालकांना केले अभिवादन

By योगेश पांडे | Updated: March 30, 2025 09:58 IST2025-03-30T09:57:21+5:302025-03-30T09:58:22+5:30

पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच संघ स्मृती मंदिराला भेट दिली आहे.

Prime Minister Narendra Modi visits Sangh Smriti Mandir pays tribute to the first rss Sarsanghchalak at the beginning of the New Year | पंतप्रधान नरेंद्र मोदींची संघ स्मृती मंदिराला भेट; नववर्षाच्या प्रारंभी आद्य सरसंघचालकांना केले अभिवादन

पंतप्रधान नरेंद्र मोदींची संघ स्मृती मंदिराला भेट; नववर्षाच्या प्रारंभी आद्य सरसंघचालकांना केले अभिवादन

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाला अभिवादन केले. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच संघ स्मृती मंदिराला भेट दिली आहे. संघ शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर या भेटीचे महत्त्व आणखीन वाढले आहे.

संघ प्रक्रियेत वर्ष प्रतिपदेला फार महत्व असते. तिथीनुसार डॉ. हेडगेवार यांची जयंतीदेखील असते. या दिवशी मोदींची संघस्थानी भेट झाल्याने राजकीय व सामाजिक वर्तुळाच्या नजरा रेशीमबागकडे लागल्या होत्या. सरसंघचालक मोहन भागवत, माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी तसेच संघाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील उपस्थित होते.

मोदी यांनी या परिसराची पाहणी केली व संघ पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींचे दर्शनदेखील घेतले. त्यांच्या दौऱ्यानिमित्त नागपुरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

Web Title: Prime Minister Narendra Modi visits Sangh Smriti Mandir pays tribute to the first rss Sarsanghchalak at the beginning of the New Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.