पंतप्रधान मोदी ‘सूपरह्यूमन’ आहेत का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:08 IST2021-04-05T04:08:12+5:302021-04-05T04:08:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खानाकुल (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान तृणमूलच्या अध्यक्ष व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ...

पंतप्रधान मोदी ‘सूपरह्यूमन’ आहेत का ?
लोकमत न्यूज नेटवर्क
खानाकुल (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान तृणमूलच्या अध्यक्ष व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सहा टप्प्यांचे मतदान शिल्लक असताना विधानसभा निवडणुकीत मोदी भाजपच्या विजयाचा दावा करत आहे. मोदी हे देव आहेत की ‘सूपरह्यूमन’ असा सवाल ममता यांनी उपस्थित केला. हुगली जिल्ह्यातील प्रचारसभेदरम्यान त्या बोलत होत्या.
ममता यांनी ‘आयएसएफ’चे (इंडियन सेक्युलर फ्रंट) संस्थापक अब्बास सिद्दीकी यांच्यावर देखील टीकास्त्र सोडले. अल्पसंख्याक मते विभाजित व्हावी यासाठी भाजप त्यांचे समर्थन करत आहे. राज्यात मत विभाजनासाठी आलेल्या व्यक्तिला भाजपाकडून पैसे मिळत असल्याचा आरोप त्यांनी लावला. पंतप्रधानांच्या बांगलादेश दौऱ्यामुळे तेथे दंगली भडकल्या. बंगालमधील निवडणुका प्रभावित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निवडणूक आयोगाला राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्देश देत आहेत, असा दावादेखील त्यांनी केला.
दुसरीकडे तृणमूलच्या तीन महिला नेत्यांनी पंतप्रधान मोदी महिलांचा अनादर करत असल्याचा आरोप लावला आहे. मोदी प्रचारसभेत उपहासात्मकपणे ‘दीदी ओ दीदी...’ असे म्हणत केवळ बॅनर्जी यांचाच नव्हे तर महिलांचा अपमान करत आहेत. भाजपच्या नेत्यांचे असे वागणे अयोग्य आहे. जनताच त्यांना योग्य उत्तर देईल, असे प्रतिपादन बंगालच्या मंत्री शशी पांजा यांनी केले.