पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोच्या हिंगणा मार्गाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:47 IST2019-08-31T23:46:12+5:302019-08-31T23:47:12+5:30
महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर ते सीताबर्डी या रिच-३ दरम्यान व्यावसायिक रन सुरू होणार आहे. या मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७ सप्टेंबरला कस्तूरचंद पार्कवर होणार आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोच्या हिंगणा मार्गाचे लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर ते सीताबर्डी या रिच-३ दरम्यान व्यावसायिक रन सुरू होणार आहे. या मार्गाचे लोकार्पण पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७ सप्टेंबरला कस्तूरचंद पार्कवर होणार आहे. यादरम्यान पंतप्रधान सुभाषनगर ते मुंजे इंटरचेंज स्टेशनदरम्यान मेट्रोने प्रवास करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
या कार्यक्रमासाठी प्रशासन तयारीला लागले असून जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल आणि महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी कस्तूरचंद पार्कची पाहणी केली. समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, खा. डॉ. विकास महात्मे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित उपस्थित राहणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ मार्च २०१९ रोजी खापरी ते सीताबर्डी या १३.५ कि.मी. मार्गाचे व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण केले होते. पंतप्रधानांनी नागपूरला यावे, अशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. याला उत्तर देताना प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर जूननंतर नागपूरला येणार असल्याचे मोदी यांनी सांगितले होते. त्यानुसार पंतप्रधान नागपुरात येत आहेत. कस्तूरचंद पार्कवर होणाºया कार्यक्रमात पंतप्रधान सुमारे एक लाख नागरिकांना संबोधित करतील.