वायुसैनिकांचे पालक असण्याचा अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:43 IST2017-10-09T01:43:28+5:302017-10-09T01:43:39+5:30

आकाशात उडणारे विमान पाहताना मोठेपणी पायलट (वैमानिक) होऊन सैन्यात फायटर प्लेन किंवा विमान चालविणे हे प्रत्येकाने लहानपणी हमखासपणे जोपासलेले स्वप्न.

 The pride of being a parent of the air force | वायुसैनिकांचे पालक असण्याचा अभिमान

वायुसैनिकांचे पालक असण्याचा अभिमान

ठळक मुद्देसैनिक म्हणजे हिरोच : देवांकित, केतकी, ईशान यांनी वाढविली शान

निशांत वानखेडे/अंकिता देशकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आकाशात उडणारे विमान पाहताना मोठेपणी पायलट (वैमानिक) होऊन सैन्यात फायटर प्लेन किंवा विमान चालविणे हे प्रत्येकाने लहानपणी हमखासपणे जोपासलेले स्वप्न. प्रत्येक ाचे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही, मात्र वैमानिकांबद्दलचे आकर्षण कमी होत नाही. सैनिक म्हटले की, देशसेवेला समर्पित केलेले जीवन. त्यामुळे स्थलसेना असो, नौदल असो की वायुसेना, यात सेवा देणाºयांबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात एक आस्था आहे. हे सैनिक म्हणजे सलाम करावा असे हिरोच. त्यामुळे संपूर्ण देशवासी ज्यांच्याविषयी आपुलकी बाळगून आहेत, त्यांच्या पालकांना किती अभिमान वाटावा?
लहानपणी बोबडे बोलताना वायुसेनेत जायचे आहे असे सांगावे आणि मोठेपणी प्रत्यक्ष ते स्वप्न पूर्ण करावे, तेव्हा पालकांचा ऊर भरून येणार नाही तर नवल.
‘वायुसेना दिना’निमित्त वायुसेनेत निवड झालेल्या नागपूरच्याही अशा ‘हिरों’नी शहरवासीयांना गौरवान्वित केले आहे. सुखोई पायलट फ्लाईट लेफ्टनंट देवांकित शिरपूरकर, स्क्वॉड्रन लीडर ईशान केळकर आणि फ्लाईट लेफ्टनंट केतकी टोळ या नागपूरकर हिरोंच्या पालकांशी लोकमतने संवाद साधला. काळजी आहे, पण देशसेवेला समर्पित असण्याचा अभिमानही आहे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
वायुसेनेच्या मेन्टेनन्स कमांडचे मुख्यालय नागपूरला असल्याने हा क्षण महत्त्वाचा ठरतो.
देवांकितने पाचव्या वर्गातच घेतला निर्णय
सुखोई ३०एमकेआयचा चालक फ्लाईट लेफ्टनंट देवांकित शिरपूरकर सध्या पुण्यात सेवारत आहे. त्याचे वडील मिलिंद शिरपूरकर यांनी सांगितले, तो पाचव्या वर्गात असताना त्याला कस्तूरचंद पार्कवर असलेले रिमोटवर उडणाºया प्लेनचे प्रदर्शन पाहायला नेले होते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याने अगदी लक्षपूर्वक पाहिले आणि बाहेर निघताच वायुसेनेत करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली.‘त्याची आई मुग्धा व मी, आम्ही त्याचे बोलणे गंभीरपणे घेतले नाही. मात्र तरुणपणीही करिअर निवडताना तो वायुसेनेच्या निवडीवर ठाम होता.’ आम्हीही त्याच्या इच्छेनुसार प्रोत्साहन दिले. मिलिंद म्हणाले,‘देवाने तुमच्या खांद्यावर असलेल्या मुलाला विशेष करण्यासाठी पाठविले आणि या कथेवर माझा विश्वास आहे.’ सेवानिवृत्त एसीपी असलेले मिलिंद सांगतात,‘तुमचा मुलगा सैन्यात पायलट आहे, असे कुणाकडून ऐकतो तेव्हा अभिमान वाटतो.’ शिरपूरकर यांना एकच मुलगा आहे. मात्र ‘मला आणखी दोन मुले असती तर एकाला सैन्यात आणि दुसºयाला नौदलात पाठविले असते’, असे मनोगत मिलिंद शिरपूरकर यांनी व्यक्त केले.
केतकीने निर्णय सार्थ केला : टोळ
‘केतकीने सातवीत असताना पायलट होण्याची इच्छा केली होती. मोठेपणी हे आकर्षण कमी होईल असे आम्हाला वाटले, मात्र तसे झाले नाही. ती तिच्या निर्णयावर ठाम होती आणि वायुसेनेची सेवा पत्करून तिने निर्णय सार्थ ठरविला.’ वायुसेनेच्या सहारनपूर बेसवर सेवारत फ्लाईट लेफ्टनंट केतकी टोळ यांचे वडील जिल्हा परिषदेत अभियंता असलेले मंगेश टोळ यांनी केतकीबाबत ही आठवण सांगितली. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केल्यानंतर केतकीने वायुसेनेत जाण्याची लहानपणीची इच्छा व्यक्त केली. तिच्या आईला काळजी वाटली. मात्र आम्ही तिच्या निवडीत अटकाव केला नाही. इच्छेप्रमाणे ती अ‍ॅफकॅट(एअर फोर्स कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट)ची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि वायुसेनेत जाण्याचे स्वप्न तिने पूर्ण केले. आज तिच्या निवडीचा आम्हाला अभिमान वाटतो, असे मनोगत मंगेश टोळ यांनी व्यक्त केले. ‘आज प्रत्येक क्षेत्रात रिस्क आहे. तरुण मुले त्यांच्या करिअरबाबत ठाम आहेत. पालकांनीही त्यांच्या निवडीचा सन्मान करणे आवश्यक आहे.’ असे मत व्यक्त करताना आम्हाला केतकीच्या निवडीचा अभिमान आहे, ही भावना त्यांनी व्यक्त केली.

Web Title:  The pride of being a parent of the air force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.