लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 12:15 IST2025-07-20T12:14:14+5:302025-07-20T12:15:49+5:30
दोन्ही विमान आधी लँडिंगच्या तयारीत होती; पण धावपट्टीच्या अगदी जवळ गेल्यावर अचानक इंजिनचा वेग वाढला आणि विमान थेट आकाशात परत गेले.

लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
नागपूर : नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सकाळी अचानक दाट धुक्याने झाकलेले आकाश आणि क्षीण झालेली दृश्यता यामुळे थरारक क्षण निर्माण झाले. इंडिगोच्या बंगळुरू-नागपूर आणि मुंबई-नागपूर या दोन विमानांनी धावपट्टीपर्यंत झेप घेतली होती, मात्र रनवे स्पष्ट न दिसल्याने दोन्ही वैमानिकांना तातडीने ‘गो-अराऊंड’ करण्याचा निर्णय घ्यावा लागला. अचानक आकाशात पुन्हा झेपावलेल्या विमानांनी प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवला. काही क्षणांसाठी विमानात सन्नाटा पसरला, अनेकांच्या मनात अनिष्ट कल्पना डोकावल्या. काहींना नुकतीच झालेली अहमदाबाद दुर्घटना आठवली. दोन्ही विमानांच्या लँडिंगला तब्बल २० ते २५ मिनिटांचा उशीर झाला. अखेर, दुसऱ्या प्रयत्नात दोन्ही विमाने सुखरूपपणे धावपट्टीवर उतरली आणि प्रवाशांनी सुटकेचा मोठा नि:श्वास टाकत विमानतळावर पाऊल ठेवले.
अचानक इंजिनचा वेग वाढला!
दोन्ही विमान आधी लँडिंगच्या तयारीत होती; पण धावपट्टीच्या अगदी जवळ गेल्यावर अचानक इंजिनचा वेग वाढला आणि विमान थेट आकाशात परत गेले. त्यामुळे प्रवाशांचे धाबे दणाणले. काही जणांना थरारकच वाटले.
दोन विमानांचे दुसऱ्यांदा लँडिंग
इंडिगोचे ६ ए ६००३ हे बेंगळुरू-नागपूर विमान सकाळी ६:५० वाजता आणि ६ई-५३४९ मुंबई-नागपूर विमान सकाळी ७:२० वाजता नागपूर विमानतळावर उतरणार होते; परंतु कमी दृश्यमानतेमुळे वैमानिकांना विमान पुन्हा आकाशात न्यावे लागले. दोन्ही विमानांनी २० ते २५ मिनिटे आकाशात घिरट्या घातल्यानंतर धावपट्टीवर सुखरूप उतरले. या नैसर्गिक अडथळ्यामुळे विमानातील प्रवाशांना काही काळ धक्का बसला. बेंगळुरू-नागपूर विमान सकाळी ७:१० वाजता आणि मुंबई-नागपूर विमान सकाळी ७:५० वाजता उतरले. ही दोन्ही विमाने एअरबस ३२० निओ विमानाद्वारे चालविली जातात.
२० ते २५ मिनिटे विमानाच्या हवेत घिरट्या
जवळपास २० ते २५ मिनिटे विमान हवेत घिरट्या घालत राहिले आणि शेवटी दोन्ही विमाने वैमानिकाच्या कुशलतेमुळे सुखरूपपणे धावपट्टीवर उतरले. प्रवाशांनी उतरल्यावर सुटकेचा नि:श्वास सोडला; पण भीतीचा अनुभव त्यांच्या मनात दीर्घकाळ ठसा उमटवून गेला. ही घटना काहीशी अहमदाबाद विमान दुर्घटनेची आठवण करून देणारी होती.