‘डीजीसीए’ अधिकाऱ्याचा अहवाल तयार

By Admin | Updated: September 17, 2015 03:26 IST2015-09-17T03:26:42+5:302015-09-17T03:26:42+5:30

राष्ट्रपतींच्या विमानासमोर आठ डुकरे आल्याच्या गंभीर प्रकरणाची चौकशी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय(डीजीसीए) ....

Prepare the report of the DGCA officer | ‘डीजीसीए’ अधिकाऱ्याचा अहवाल तयार

‘डीजीसीए’ अधिकाऱ्याचा अहवाल तयार

राष्ट्रपतींच्या विमानासमोर आठ डुकरे : दिवसभर चौकशी
नागपूर : राष्ट्रपतींच्या विमानासमोर आठ डुकरे आल्याच्या गंभीर प्रकरणाची चौकशी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय(डीजीसीए) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय)अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळपर्यंत केली. डीजीसीए अधिकाऱ्याने चौकशी अहवाल तयार केला असून गुरुवारी नवी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविणार असल्याची माहिती आहे.
गंभीर प्रकरणाच्या चौकशीसाठी डीजीसीएच्या पश्चिम क्षेत्राचे (मुंबई) सहायक संचालक ब्राह्मणे आणि एएआयच्या पश्चिम विभागाचे महाव्यवस्थापक चीम सोम यांनी स्वतंत्ररीत्या बुधवार सकाळपासूनच चौकशी सुरू केली. ब्राह्मणे यांनी धावपट्टी आणि सीमेच्या आतील परिसराची पाहणी केली. सोलर फेन्सिंग, लँडिंग सिस्टीम, जोल गन आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक सर्व पैलूंची चौकशी केली. मिहान इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) कार्यान्वयन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. यासह त्यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) अधिकाऱ्यांचीही कसून चौकशी केल्याची माहिती आहे.
राष्ट्रपतींच्या विमानासमोरून गेलेली आठ डुकरे सोलर फेन्सिंगच्या खालून धावपट्टीवर आली होती आणि फेन्सिंगच्या खालून परत गेली व टॅक्सी-वेच्या गेटमधून बाहेर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोलर फेन्सिंगच्या त्रुटींवर लोकमतने बुधवारच्या अंकात प्रकाश टाकला होता, हे उल्लेखनीय.(प्रतिनिधी)

Web Title: Prepare the report of the DGCA officer