‘कस्टडी डेथ’मुळे एपीआयचे किस्सेही चर्चेत

By Admin | Updated: June 6, 2016 03:03 IST2016-06-06T03:03:59+5:302016-06-06T03:03:59+5:30

चोरीच्या आरोपात पकडण्यात आलेल्या आरोपीने आत्महत्या केल्यामुळे (कस्टडी डेथ) सीताबर्डी पोलीस ठाणे पुन्हा एकदा

'Precious Death' discussions of API | ‘कस्टडी डेथ’मुळे एपीआयचे किस्सेही चर्चेत

‘कस्टडी डेथ’मुळे एपीआयचे किस्सेही चर्चेत

नरेश डोंगरे ल्ल नागपूर
चोरीच्या आरोपात पकडण्यात आलेल्या आरोपीने आत्महत्या केल्यामुळे (कस्टडी डेथ) सीताबर्डी पोलीस ठाणे पुन्हा एकदा सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे. सोबतच वरिष्ठांच्या नावाखाली सीताबर्डीसह या झोनमधील पाच पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपल्या बोटावर नाचवणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचेही किस्से रविवारी सकाळपासूनच पोलीस दलात चर्चेला आले आहे. १० वर्षांपूर्वी मालखान्यातील चांदी चोरीच्या प्रकरणाने सीताबर्डी पोलीस ठाण्याला चर्चेच्या प्रकाशझोतात आणले होते. त्यानंतर पाच वर्षांपूर्वी वसंतराव नाईक झोपडपट्टीत झालेल्या हत्याकांडाने सीताबर्डी ठाण्याचा कारभार चर्चेला आला.

तोडीबाज नेटवर्क
या अधिकाऱ्याचे प्रशस्त तोडीबाज नेटवर्क आहे. देहविक्रय करवून घेणारे लॉजमालक आणि दलाल तसेच तोडीबाज दलालही चर्चेचा विषय आहे. परंतु, त्याची थेट तक्रार करण्याची हिंमत कुणी दाखवू शकले नाही. एका प्रकरणात मध्यंतरी त्याने हस्तक्षेप करून दलालाच्या माध्यमातून फिर्यादीला रात्री उशिरा आपल्या निवासस्थानी बोलवून घेतल्याचीही चर्चा झाली होती. कमालीचा चाणाक्ष अन् गोडबोल्या असलेला हा अधिकारी स्वत:वर बालंट येऊ देत नाही. गुन्हेशाखेने शनिवारी मोबाईल विक्रेत्यांवर सीबीआय स्टाईल दणकेबाज कारवाई केली. त्या मोबाईल विक्रेत्यांना या एपीआयचेच अभय होते. महिन्याला मोठी देण मिळत असल्याने तोच ‘साहेबांचे‘ नाव पुढे करून कारवाई थांबवत होता. त्याचमुळे बनावट अ‍ॅसेसरीज तसेच बनावट लोगो वापरून ग्राहकांची लुबाडणूक करणाऱ्या मोबाईल विक्रेत्यांवर सीताबर्डी पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत होते, या आरोपाला मोबाईल विकेत्यांवरील दणकेबाज कारवाईमुळे दुजोरा मिळाला आहे.

उपायुक्तांपेक्षाही जास्त दरारा
४केवळ मोबाईलच्याच नव्हे तर अनेक प्रकरणात तो थेट हस्तक्षेप करून पोलीस निरीक्षक , सहायक निरीक्षक किंवा उपनिरीक्षकांची कोंडी करतो,अशी ओरड आहे. त्याचा दरारा पोलीस उपायुक्तांपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे संबंधित परिमंडळात येणाऱ्या अनेक ठाण्यातील हवालदार, शिपाई तर साहेबांपेक्षा या एपीआयच्याच सेवेत राहणे पसंत करतात. अवैध हुक्का पार्लर, लॉज, हॉटेल, गार्डन रेस्टॉरंटचे मालक झोन साहेबांपेक्षा याच अधिकाऱ्याला अर्थपूर्ण ‘दुवा-सलाम‘ करतात, त्याचीही उघड चर्चा आहे. वरिष्ठांच्या लक्षात हा प्रकार आला कसा नाही, त्याबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: 'Precious Death' discussions of API