नागपूरच्या प्रतापनगर पोलीस ठाण्यातून महिला आरोपी पळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 19:47 IST2019-07-11T19:45:58+5:302019-07-11T19:47:47+5:30
चोरीच्या आरोपात पोलिसांनी ताब्यात घेतलेली शीलाबाई मदनलाल कुंभार (वय ६०) नामक आरोपी महिला गुरुवारी सकाळी पोलीस ठाण्यातून पळून गेली. यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

नागपूरच्या प्रतापनगर पोलीस ठाण्यातून महिला आरोपी पळाली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चोरीच्या आरोपात पोलिसांनी ताब्यात घेतलेली शीलाबाई मदनलाल कुंभार (वय ६०) नामक आरोपी महिला गुरुवारी सकाळी पोलीस ठाण्यातून पळून गेली. यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मूळची तिरुपती बालाजी येथील रहिवासी असलेली शीलाबाई हिला बुधवारी सायंकाळी बजाजनगर पोलिसांनी चोरीच्या आरोपावरून ताब्यात घेतले होते. गुन्हा प्रतापनगर ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तिला प्रतापनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. प्रतापनगर ठाण्यात महिला कोठडी (लेडीज लॉकअप) नसल्याने पोलिसांनी तिला रात्रभर ठाण्यात बसवून ठेवले. दरम्यान, पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान पोलिसांचा डोळा लागल्याचे लक्षात येताच शीलाबाईने ठाण्यातून पळ काढला. काही वेळेनंतर हा प्रकार लक्षात येताच सर्वत्र खळबळ निर्माण झाली. नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शहरातील सर्व पोलीस ठाण्यात या संबंधीची माहिती देण्यात आली. शीलाबाईचे वर्णन कळविण्यात आले. तिला पकडण्यासाठी पोलिसांनी शहरभर धावपळ चालवली. मात्र, दुपारी २ वाजेपर्यंत तिचा पत्ता लागला नव्हता.