बेताल प्रशांत कोरटकरच्या ‘डॉक्टरेट’चेदेखील गौडबंगाल
By योगेश पांडे | Updated: March 3, 2025 19:04 IST2025-03-03T19:03:39+5:302025-03-03T19:04:34+5:30
पदवी देणाऱ्या विद्यापीठाला यूजीसीची मान्यताच नाही : पैसे देऊन मिळते डॉक्टरेट, उच्च शिक्षण मंत्री घेणार का दखल ?

Prashant Kortkar's 'Doctorate' is also fake
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर माजी पत्रकार प्रशांत कोरटकर चर्चेत आला आहे. कोरटकर अद्यापही फरार असला तरी त्याच्या विविध कारनाम्यांची चर्चा रंगते आहे. कोरटकर सोशल माध्यमांपासून सर्वच ठिकाणी स्वत:ला पीएचडी प्राप्त डॉक्टर म्हणवतो व नावासमोरदेखील डॉ. असे लिहीतो. परंतु प्रत्यक्षात त्याने एका खाजगी विद्यापीठाकडून मानद ‘डॉक्टरेट’ मिळविली असून त्या संस्थेला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यताच नाही. अशा स्थितीत नियमानुसार कोरटकर हा कुठल्याही दृष्टीने उच्चविद्याविभूषित मानल्या जाऊ शकत नाही. मात्र तो मागील पाच वर्षांपासून जगाच्या डोळ्यात धूळफेक करत आहे.
कोरटकर हा ‘आयपीएस’ वर्तुळात सक्रिय असतो तसेच काही राजकीय नेत्यांसोबतदेखील त्याचे संबंध आहेत. मार्च २०२० मध्ये कोरटकरला भारत व्हर्चुअल युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट मिळाली. त्यानंतर तो नावासमोर डॉक्टर लिहून ‘शायनिंग’ मारू लागला. त्याचे व्हिजिटिंग कार्ड, सोशल माध्यमे त्याचप्रमाणे पत्रव्यवहारातदेखील तो ‘डॉ’ असे नावासमोर लिहू लागला. ‘लोकमत’ने या बाबीची चाचपणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. कोरटकरने भारत व्हर्चुअल युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट मिळविली आहे. संबंधित विद्यापीठातून ही डॉक्टरेट मिळविण्याचे कुठलेही अधिकृत मापदंड नाहीत. यासाठी कुठलीही पात्रता परीक्षा होत नाही किंवा कुठलेही संशोधन तसेच संबंधित क्षेत्रात अत्युच्च दर्जाचे कामदेखील अपेक्षित नसते. ‘लोकमत’ने याबाबत विद्यापीठाच्या क्रमांकावर संपर्क करून खातरजमादेखील केली आहे. एकीकडे पीएचडी मिळविण्यासाठी उमेदवार दिवसरात्र एक करून अभ्यास व संशोधन करतात. मात्र दुसरीकडे कोरटकरसारख्या प्रवृत्ती पैशांच्या जोरावर डॉक्टरेटचा मान विकत घेऊन स्वत:ला उच्चविद्याविभूषित म्हणवत सरकारी यंत्रणेतच वावरतात हा विरोधाभास दिसून येत आहे. छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कोरटकरकडून स्वत:ला उच्चविद्याविभूषित दाखविण्याचा हा प्रयत्न असून राज्याचे शिक्षणमंत्री व शासकीय यंत्रणा याची दखल घेईल का असा सवाल उपस्थित होत आहे.
पैसे द्या अन मानद डॉक्टरेट मिळवा
संबंधित भारत व्हर्चुअल युनिव्हर्सिटीचे कार्यालय दिल्ली व बंगळुरू येथे आहे. या विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाची कुठलीही मान्यता नाही. चक्क संयुक्त राष्ट्रांत नोंदणी असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र कोणत्याही शैक्षणिक संस्थेची मान्यता नाही व संलग्नीकरणदेखील नाही. याच नावाने दिल्ली व झारखंडमध्येदेखील एक व्हर्चुअल युनिव्हर्सिटी आहे.पुर्व अफ्रिकेतील मालवी येथील सेंट्रल ख्रिश्चन युनिव्हर्सिटीसोबत संलग्न असल्याचा दावा त्या व्यवस्थापनाकडून करण्यात येतो. सद्यस्थितीत तेथील मानद डॉक्टरेटचा दर ७५ हजार रुपये इतका आहे.