१९८५ ठिकाणी पकडली वीज चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:09 IST2021-09-23T04:09:44+5:302021-09-23T04:09:44+5:30

नागपूर : महावितरणने नागपूर शहरातील थकबाकीदार तसेच वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांच्या विरोधात धडक मोहीम सुरु केली आहे. मागील सहा ...

Power theft caught in 1985 | १९८५ ठिकाणी पकडली वीज चोरी

१९८५ ठिकाणी पकडली वीज चोरी

नागपूर : महावितरणने नागपूर शहरातील थकबाकीदार तसेच वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांच्या विरोधात धडक मोहीम सुरु केली आहे. मागील सहा महिन्यांत वेगवेगळ्या प्रकारे वीज चोरी करणाऱ्या १,९८५ ग्राहकांविरुद्ध वीज चोरीची कारवाई करण्यात आली आहे. या ग्राहकांकडून १.२६ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून ही मोहीम तीव्र करण्यात आली असून दोन दिवसात १२ लाखांची वसुली करण्यात आली आहे.

महावितरणच्या वतीने मार्च २०२१ पासून शहरातील विविध भागात थकबाकी वसुली व वीज चोरी विरुद्ध सातत्याने मोहिमा राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत १४० वीज ग्राहकांवर कारवाई केली आणि त्यांच्याकडून ६ लाख १५ हजार रुपये वसूल करण्यात आले. वीज तारांवर आकडे टाकणाऱ्या ७९४ वीज ग्राहकांवर महावितरणने कारवाई करत त्यांच्याकडून १६ लाख ४५ हजार रुपयांच्या दंडाची रक्कम वसूल केली. या शिवाय वीज मीटरमध्ये फेरफार करून किंवा छेडखानी करून ग्राहक वीज बिल कमी करण्याचा प्रयत्न करतात अशा १ हजार ५१ ग्राहकांवर महावितरणने कारवाई केली. या ग्राहकांकडून १ कोटी ४ लाख रुपयांची वसुली करण्यात आली.

वीज मीटरमध्ये फेरफार करणे,आकडा टाकून वीज चोरी करणे अथवा ज्या कामांसाठी वीज पुरवठा घेण्यात आला आहे त्या ऐवजी वेगळ्या कारणांसाठी वीज वापर करणे ही सर्व कृत्ये वीज कायद्यानुसार वीज चोरी अंतर्गत येतात. मीटरमध्ये फेरफार केल्यास मीटर जप्त करण्यात येते तसेच सर्वच वीज चोरीच्या प्रकरणात जबर दंडात्मक कारवाईही केली जाते आणि फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात येतो.त्यामुळे वीज ग्राहकांनी असे कोणतेही बेकायदेशीर कृत्य करू नये, असे महावितरणच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी म्हटले आहे.

Web Title: Power theft caught in 1985

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.