लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरजिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात गेल्या १०-१२ वर्षांपासून कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी (वर्ग ३, श्रेणी ३) पदे भरण्यात आलेली नाहीत. ही पदे कुठे गायब झाली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या कारणास्तव शेकडो प्राथमिक शिक्षकांचे पदोन्नतीपासून नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद शिक्षण विभागात मंजूर असलेल्या ५४ पदांपैकी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची ही पदे बेकायदेशीरपणे श्रेणी २ मध्ये रूपांतरित करण्यात आली आहेत. कोणतीही शासन मान्यता न घेता तत्कालीन अधिकाऱ्यांनी हा गैरव्यवहार केला असल्याचे समजते. यामुळे कनिष्ठ अधिकाऱ्यांना ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे वेतन देण्यात आले, ज्यामुळे शासनाला लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
या गंभीर गैरव्यवस्थेविरोधात नागपूर जिल्हा परिषद केंद्रप्रमुख समन्वय समितीचे जिल्हा समन्वयक तसेच मनसे शिक्षक-शिक्षकेतर सेनेचे राज्य सरचिटणीस शरद भांडारकर यांनी शासनाकडे तक्रार दाखल करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पदोन्नतीही नाही, वेतनवाढही नाहीया प्रकारामुळे गेल्या दशकात शेकडो शिक्षकांना पदोन्नती मिळाली नाही. पदोन्नतीमुळे मिळणारे आर्थिक लाभ आणि वरिष्ठ पदावरील जबाबदाऱ्या यांच्यापासून हे शिक्षक वंचितच राहिले आहेत.
माहिती दडपली जातेय?जिल्हा परिषदेच्या मुख्यालय आणि पंचायत समिती स्तरावर असलेल्या पदांपैकी श्रेणी ३ आणि श्रेणी २ यांची अचूक वर्गवारी शिक्षण विभागाने जाणीवपूर्वक दडपली असल्याचा आरोप आहे. लेखा, वित्त आणि सामान्य प्रशासन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकार पुढे आला नसल्याचा आरोप भांडारकर यांनी केला आहे.