coronavirus; स्थगित केलेल्या एका लग्नसोहळ्याची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 10:12 AM2020-03-18T10:12:23+5:302020-03-18T10:14:28+5:30

बतकी कुटुंबाने वरपक्षाकडील लोकांना बोलावून लग्नसोहळा स्थगित करण्याचा विचार बोलला. वरपक्षानेही सामंजस्य दाखवत या निर्णयाचा स्वीकार केला.

A postponed wedding ceremony | coronavirus; स्थगित केलेल्या एका लग्नसोहळ्याची गोष्ट

coronavirus; स्थगित केलेल्या एका लग्नसोहळ्याची गोष्ट

googlenewsNext
ठळक मुद्देबतकी व डाहुले कुटुंबाचे धाडसी पाऊलशेकडोंच्या सुरक्षेचा विचार

निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन दिवसावर लग्न येऊन ठेपले, गावोगावी नातेवाईकांकडे पत्रिका पोहचल्या... अगदी दुबईपर्यंतच्या नातेवाईकांकडे निरोप पोहचला...लग्नाचे लॉन बुक झाले, वधू-वराच्या घरी लग्नाची धामधूम सुरू झाली आणि तयारीत असलेले नातेवाईक लग्नसोहळ््यासाठी नागपूरकडे रवाना होणार...अशातच मोबाईलवर संदेश धडकला...लग्न सोहळा पुढे ढकलण्यात येत आहे... होय, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता येणाऱ्या पाहुण्यांच्या सुरक्षेचा विचार करता लग्न स्थगित करण्यात येत आहे, त्यामुळे लग्नाला येऊ नका...
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. या प्रभावातून महाराष्ट्रही सुटला नसून इतिहासातील सर्वात मोठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण या ‘कोरोना’मुळे लग्नकार्यच स्थगित करावं लागेल हा विचार मात्र कुणी केला नसेल. पण होय, नागपूरची अश्विनी बतकी आणि बुटीबोरीचा आकाश डाहुले यांचा स्थगित झालेला विवाह सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. झाले असे की, उदयनगरजवळच्या जानकीनगर येथील रहिवासी सेवानिवृत्त मुख्याध्यापक असलेल्या अण्णाजी बतकी यांची मुलगी अश्विनी हिचा विवाह ठरलेल्या मुहूर्तानुसार येत्या १९ मार्च रोजी बुटीबोरी निवासी विठ्ठलराव डाहुले यांचा मुलगा आकाश याच्याशी ठरला होता. दोन महिन्यांपूर्वी २३ जानेवारी रोजी लग्नाबाबत बोलणी आटोपल्यानंतर १६ फेब्रुवारीला साक्षगंध पार पडला. १९ मार्चला वासवी लॉन, बजाजनगर येथे सायंकाळी हा विवाह निर्धारित करण्यात आला. पत्रिका छापण्यात आल्या आणि पुणे, मुंबई, बंगरूळू आणि गावोगावच्या नातेवाईकांपर्यंत पोहचविण्यात आल्या. बतकी कुटुंबानुसार अगदी दुबईतील नातेवाईकांकडे त्या पोस्टाने पोहचविण्यात आल्या. इकडे वधूपक्ष आणि वरपक्षाकडेही तयारी सुरू झाली होती. लॉन बुक झाले, जेवणावळीचे आॅर्डरही निर्धारित झाले, लग्नासाठी आवश्यक असलेली सर्व खरेदी पूर्ण झाली. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. पण गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून थैमान घातलेल्या कोरोनामुळे लग्नावरही भीतीचे सावट निर्माण झाले आणि हळूहळू ते अधिक गडद होऊ लागले. लग्नात दोन-अडीच हजार लोक येणार, दूरवरून कुठूनही येणार... त्यातील एखादा कोरोनाबाधित असला तर... अशा शंकाकुशंकांनी चिंतेचे ढग दाटले होते. बतकी कुटुंबाकडे मोठे वडील, काका, मामा असे जवळचे नातेवाईक पोहचूनही गेले. पण काय करावे, हा विचार सतत चिंता वाढवत होता. लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपले.
अशात राज्य शासनाने जमावबंदीचा आदेश लागू केला. यामुळे कायद्याचा बडगा आला तर, ही चिंतासुद्धा त्यात जुळली आणि शेवटी बतकी कुटुंबाने वरपक्षाकडील लोकांना बोलावून लग्नसोहळा स्थगित करण्याचा विचार बोलला. वरपक्षानेही सामंजस्य दाखवत या निर्णयाचा स्वीकार केला.

सर्वांकडून निर्णयाचे स्वागत
बतकी कुटुंबाने जवळपास ७०० ते ८०० लोकांना मंगळवारी सकाळपासून लग्न स्थगित करण्यात आल्याचे संदेश पाठविले. तीच अवस्था डाहुले कुटुंबाचीही होती. विशेष म्हणजे आश्चर्य व्यक्त करतानाच सर्वांकडून या निर्णयाचे स्वागतही केले गेल्याची माहिती अण्णाजी बतकी यांनी सांगितली. तयारीसाठी केलेला खर्च, इतक्या दिवसांपासून मनात साठलेला उत्साह, या कशाचाही विचार न करता नागरिकांची सुरक्षा ध्यानात ठेवून घेतलेल्या निर्णयाने बतकी व डाहुले कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हॅँडवॉश, सॅनिटायझरची केली होती व्यवस्था
कोरोनाची भीती जरी असली तरी कुठल्याही परिस्थितीत विवाह करावा, यासाठी बतकी कुटुंबाचे प्रयत्न चालले होते. त्यासाठी दोन-अडीच हजार रुपयांचे सॅनिटायझर व हॅँडवॉशची व्यवस्था कुटुंबाने केली होती. वर-वधूच्या स्टेजवर जाणाऱ्या प्रत्येकाला सॅनिटायझर आणि जेवणावळीकडे जाणाऱ्यांना हॅँडवॉश देण्याची व सुरक्षितता करण्याची तयारी चालविल्याचेही अण्णाजी यांनी सांगितले. पण मंगळवारी जमावबंदीचा आदेश धडकल्यानंतर सोहळाच रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: A postponed wedding ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.