पोस्टमन गरजूंना पोहचविणार रक्कम :मदतीसाठी डाक विभागाची धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 21:20 IST2020-03-26T21:19:10+5:302020-03-26T21:20:24+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात आपल्या घरात बंदिस्त झालेले ज्येष्ठ नागरिक आणि गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी डाक विभाग समोर आला आहे. यापुढे पोस्टमन या गरजवंतांना ५००० रुपयापर्यंतची रक्कम घरी पोहचवतील.

पोस्टमन गरजूंना पोहचविणार रक्कम :मदतीसाठी डाक विभागाची धाव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात आपल्या घरात बंदिस्त झालेले ज्येष्ठ नागरिक आणि गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी डाक विभाग समोर आला आहे. यापुढे पोस्टमन या गरजवंतांना ५००० रुपयापर्यंतची रक्कम घरी पोहचवतील. डाक विभागाचे वरिष्ठ प्रवर अधीक्षक यांनी गुरुवारी याबाबत आदेश दिले.
सध्याच्या परिस्थितीत नागपूर शहर क्षेत्राचे २८ डाकघरांचे काम सुरू आहे. निर्धारित अंतर लक्षात घेत नागरिक या डाकघरांच्या सेवेचा लाभ घेऊ शकतात. मात्र अनेक असे नागरिक आहेत जे कार्यालयापर्यंत पोहचण्यास असक्षम आहेत किंवा त्यांना इतर समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा गरजू व्यक्तींसाठी टपाल विभागाने व्यवस्था केली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीचे टपाल विभागाचे खातेधारक असण्याची आवश्यकता नाही. हे गरजू नागरिक कोणत्याही बँकेचे खातेधारक असले तरी डाक विभाग त्यांना नि:शुल्क सेवा देणार आहे. यासाठी नागपुरात राहणाऱ्या व्यक्तीने इतवारी येथील मुख्य डाकघराच्या कॉल सेंटरवर दूरध्वनी क्रमांक ०७१२-२७६५४२० यावर आणि पश्चिम नागपूर क्षेत्रात राहणारे नागरिक जीपीओमध्ये ०७१२-२५६०१७० या क्रमांकावर सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत संपर्क करू शकतील.
अशी मिळेल सुविधा
कोणत्याही बँकेचे खातेधारक ज्येष्ठ नागरिक वरील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क केल्यानंतर टपाल कर्मचारी जवळच्या डाकघराशी संपर्क करून दिलेल्या पत्त्याबाबत माहिती घेतील. या माहितीला ते संबंधित पोस्ट ऑफिसपर्यंत पोहचवतील. त्या डाकघरात सेवा देणाऱ्या पोस्टमनला संबंधित पत्त्यावर पाठविण्यात येईल. पोस्टमन दिलेल्या पत्त्यावर पोहचून खातेधारकाचा मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड तपासून त्याला मदत करतील. यानंतर ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी क्रमांक आल्यानंतर पोस्टमन ग्राहकांना त्यांनी मागविलेली रक्कम सोपवतील. यासाठी खातेधारकाचा मोबाईल नंबर बँकेत नोंदणीकृत असणे गरजेचे आहे.
बी.व्ही. रमण, वरिष्ठ प्रवर अधीक्षक, डाक विभाग