पदवीधरचा निकाल सूर्यास्तानंतर
By Admin | Updated: June 22, 2014 01:06 IST2014-06-22T01:06:40+5:302014-06-22T01:06:40+5:30
शुक्रवारी झालेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी २४ जून रोजी होणार असून अंतिम निकाल जाहीर होण्यास रात्र होण्याची शक्यता आहे.सिव्हील लाईन्समधील प्रोव्हिडन्स हायस्कूलमध्ये

पदवीधरचा निकाल सूर्यास्तानंतर
२४ रोजी मतमोजणी : प्रोव्हिडन्स हायस्कूल सज्ज
नागपूर : शुक्रवारी झालेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी २४ जून रोजी होणार असून अंतिम निकाल जाहीर होण्यास रात्र होण्याची शक्यता आहे.सिव्हील लाईन्समधील प्रोव्हिडन्स हायस्कूलमध्ये सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. यासाठी एकूण २४ टेबल लावले जातील. १४ उमेदवार रिंगणात आहेत.
सहा जिल्ह्यातील एकूण ३१७ मतदान केंद्रावर एकूण १ लाख ७३ मतदारांनी मतदान केले आहे. या सर्व मतांमधून सुरुवातीला अवैध आणि ‘नोटा’ची मते वेगळी केली जातील. त्यानंतर एकूण वैध मतांमधून विजयी मतांचा कोटा निश्चित केला जाईल. या संपूर्ण प्रक्रियेला दुपारचे २ वाजण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रथम क्रमांकाच्या पसंतीक्रमाच्या मोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीसाठी ठेवण्यात येणाऱ्या २४ टेबलवर प्रत्येकी एक हजार मतांची एकाच वेळी मोजणी होईल. त्यामुळे पहिल्या फेरीत २४ हजार मतांची मोजणी होईल.
एकूण मतांची संख्या लक्षात घेता चार ते पाच राऊंड होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रक्रियेला रात्रीचे ९ वाजण्याची शक्यता आहे. असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब धुळाज यांनी सांगितले.
दरम्यान सिव्हील लाईन्समधील प्रोव्हिडन्स स्कूलमध्ये मतदारसंघातील सहाही जिल्ह्यातील मतपेट्या सुरक्षित ठेवण्याचे काम सुरू झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. (प्रतिनिधी)