नागपुरात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पद तात्पुरते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 23:56 IST2018-03-01T23:56:10+5:302018-03-01T23:56:21+5:30
उपराजधानीत दरवर्षी शेकडो वाहनांची भर पडत आहे. कामाचा व्यापही वाढत आहे. परंतु प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) रिक्त पदे न भरताच तात्पुरत्या व तदर्थ स्वरूपात पदस्थापना केली जात आहे. नागपूर शहर आरटीओ व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दोन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना अशाच स्वरुपात पदोन्नती देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नागपुरात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पद तात्पुरते
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत दरवर्षी शेकडो वाहनांची भर पडत आहे. कामाचा व्यापही वाढत आहे. परंतु प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) रिक्त पदे न भरताच तात्पुरत्या व तदर्थ स्वरूपात पदस्थापना केली जात आहे. नागपूर शहर आरटीओ व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दोन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना अशाच स्वरुपात पदोन्नती देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नागपूर शहर प्रादेशिक कार्यालयांतर्गत नागपूर शहर व वर्धा आरटीओ आणि पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येते. ही तिन्ही कार्यालये मिळून गट ‘अ’ ते ‘क’ची १७८ पदे मंजूर असताना १२२ पदेच भरण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून ५६ पदे रिक्त आहेत. रिक्त पदे न भरताच सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना तात्पुरती पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे व विनोद जाधव यांना अनुक्रमे नागपूर शहर व पूर्व नागपूर कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ही पदोन्नती केवळ ११ महिन्यांची आहे. यात वेतनव्यतिरीक्त अन्य कोणतेही लाभ मिळणार नाहीत. यामुळे हे अधिकारी किती गंभीरतेने प्रशासकीय कामकाजात लक्ष देतील हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, अडीच वर्षापूर्वी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांची बदली गोंदिया येथे झाल्यावर हे पद रिक्त होते. पूर्व नागपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भूयार यांच्याकडे या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. परंतु त्यांच्याकडे नंतर गडचिरोली आरटीओ कार्यालयाचाही भार देण्यात आल्याने कामाचा ताण वाढला होता. आता दोन अधिकाऱ्यांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली. मात्र ही पदोन्नती तात्पुरती असल्याने कामाचा ताण वाढणार की कमी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरटीओ वरिष्ठांमध्ये अशा स्वरुपातील पदोन्नतीला घेऊन नाराजी व्यक्त केली जात आहे.