मेडिकलच्या सहा विभागात पॉझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 22:13 IST2020-07-25T22:10:20+5:302020-07-25T22:13:33+5:30
मेडिकलच्या सहा विभागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. या रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर, परिचारिका यांनी विशेष काळजी घेतली नसल्याने काही ‘हायरिक्स’मध्ये आले आहेत.

मेडिकलच्या सहा विभागात पॉझिटिव्ह रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलच्या सहा विभागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. या रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर, परिचारिका यांनी विशेष काळजी घेतली नसल्याने काही ‘हायरिक्स’मध्ये आले आहेत. शनिवारी या सर्वांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी सर्व डॉक्टर, परिचारिकांना प्रत्येक रुग्ण कोविड संशयित समजूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना करून रुग्ण तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. लॉकडाऊनपूर्वी मेडिकलमधील बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णांची संख्या तीन ते चार हजाराच्या घरात होती. लॉकडाऊनच्या काळात रुग्णांची संख्या ५०० वर आली. आता अनलॉक होताच रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. सध्या हजार ते दीड हजार रुग्ण उपचारासाठी येत आहेत. यातच बहुसंख्य डॉक्टर, परिचारिका कोविड हॉस्पिटलमध्ये आपली सेवा देत असल्याने नॉनकोविडमधील डॉक्टर व परिचारिकांवर रुग्णांचा ताण वाढला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व ८५ टक्क्यांवर रुग्णांना लक्षणे नसल्याने कोणता रुग्ण पॉझिटिव्ह हे ओळखणे डॉक्टरांसाठीही कठीण झाले आहे. याचा फटका डॉक्टरांसह परिचारिकांना बसत आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांत मेडिकलच्या बालरोग विभाग, स्त्री रोग व प्रसूती विभाग, बधिरीकरण विभाग, त्वचारोग विभाग, जनरल सर्जरी व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात तपासण्यात आलेला रुग्ण हा नंतर पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. साधारण ४० वर डॉक्टरांसह ८० वर परिचारिका, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. अहवाल येईपर्यंत या सर्वांना होम आयसोलेशन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अधिष्ठाता डॉ. मित्रा यांनी याला गंभीरतेने घेत प्रत्येक रुग्णाला कोविड संशयित रुग्ण म्हणूनच पाहण्याचे व मास्क, शिल्ड, फिजिकल डिस्टन्सिंग व सॅनिटायझेशनचे नियम पाळून तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत.