धंतोलीतील अवैध बांधकाम पाडा

By Admin | Updated: October 9, 2015 02:47 IST2015-10-09T02:47:04+5:302015-10-09T02:47:04+5:30

धंतोली झोन अंतर्गतची रुग्णालये, मंगल कार्यालये, हॉटेल्स यासह इतर सर्व इमारतींमधील अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश ....

Poor construction of Dhantola | धंतोलीतील अवैध बांधकाम पाडा

धंतोलीतील अवैध बांधकाम पाडा

हायकोर्टाचे आदेश : रुग्णालयांसह विविध इमारतींमध्ये नियमांचे उल्लंघन
नागपूर : धंतोली झोन अंतर्गतची रुग्णालये, मंगल कार्यालये, हॉटेल्स यासह इतर सर्व इमारतींमधील अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी महानगरपालिकेला दिलेत. तसेच, मनपाचे अधिकारी कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचा विचार केला जाईल, असेही स्पष्ट केले. अनधिकृत बांधकाम पाडल्याची तंतोतंत माहिती सादर करण्यासाठी मनपाला एक आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे.
याप्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रसन्न वराळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. मनपाने २७ मार्च २०१४ रोजीच्या आदेशानंतर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, धंतोली झोनमध्ये रुग्णालयांच्या ७० इमारती असून यापैकी ३७ इमारतींमध्ये मंजूर आराखड्यानुसार पार्किंगसाठी जागा रिकामी ठेवण्यात आली आहे. उर्वरित ३३ इमारतींमध्ये पार्किंगच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे किंवा युजरमध्ये रहिवासी/व्यावसायिक वरून रुग्णालय/नर्सिंग होम असा बदल करण्यात आला आहे. या इमारत मालकांना महाराष्ट्र नगर रचना कायद्याच्या कलम ५३ अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु, कुणीही स्वत:हून अनधिकृत बांधकाम पाडलेले नाही. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने वरीलप्रमाणे कडक आदेश दिले आहेत. धंतोलीत गल्लोगल्ली रुग्णालये उघडण्यात आली असून अनेक रुग्णालयांच्या संचालकांनी पार्किंग व इतर नियमांची पायमल्ली केली आहे. यासंदर्भात धंतोली नागरिक मंडळाचे अध्यक्ष विलास लोठे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत नागपूर काँग्रेस कमिटीचे महासचिव सुमुख मिश्रा यांनी मध्यस्थी अर्ज करून केवळ रुग्णालयेच नाही तर विविध व्यावसायिकांची कार्यालये, मंगल कार्यालये व हॉटेल्सवरही कारवाई करण्याची विनंती केली आहे. धंतोली व रामदासपेठ परिसर केवळ मेडिकलच नाही तर, कमर्शियल हबही झाले आहेत. दोन्ही परिसरात वकील, चार्टर्ड अकाऊंटंट व अन्य व्यावसायिकांनी स्वत:ची कार्यालये थाटली आहेत. त्यांच्यापैकी अनेकजण पार्किंगसंदर्भातील नियमांचे पालन करीत नाहीत, असे मिश्रा यांनी अर्जात नमूद केले आहे. याचिकाकर्त्यातर्फे वरिष्ठ वकील के. एच. देशपांडे व अ‍ॅड. अश्विन देशपांडे, मध्यस्थातर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे तर, मनपातर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
पार्किंगच्या जागेचा दुरुपयोग
कायद्यानुसार प्रत्येक इमारतीमध्ये पार्किंगसाठी आवश्यक जागा राखीव ठेवणे आवश्यक आहे. धंतोलीतील अनेक रुग्णालयांच्या व्यवस्थापकांनी इमारतींचे आराखडे मंजूर करून घेताना पार्किंगसाठी राखीव जागा दाखविली आहे. त्यानुसार इमारतीही बांधल्या आहेत. परंतु, प्रत्यक्षात पार्किंग दुसऱ्याच गोष्टीसाठी उपयोगात आणले जात आहे. काही रुग्णालयांनी पार्किंगच्या जागेवर स्वागतकक्ष, चौकशी कक्ष व रुग्ण नोंदणी कक्ष थाटले आहे तर, अनेक रुग्णालयांमधील पार्किंगची जागा रुग्णांच्या नातेवाईकांना थांबण्यासाठी उपयोगात आणली जात आहे. तसेच, पार्किंगसाठी थोडीफार वाचवून ठेवलेली जागा रुग्णालयांचे कर्मचारी वाहने ठेवण्यासाठी वापरत आहेत. यामुळे रुग्णांना भेटण्यासाठी येणारे नातेवाईक, मित्र किंवा अन्य व्यक्ती रोडवर वाहने उभी ठेवतात. परिणामी अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबते. काही रस्ते एवढे अरुंद आहेत की अवैध पार्किंगमुळे दोन्ही बाजूने एकाचवेळी वाहने पुढे काढता येत नाहीत. स्थानिक रहिवासी व अन्य नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Poor construction of Dhantola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.