नागपूर जिल्हा परिषदेतील राजकारण : गृहमंत्र्यांचे पुत्र काँग्रेसवर नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 21:20 IST2020-02-17T21:15:41+5:302020-02-17T21:20:11+5:30
उपाध्यक्षाच्या निवडीपासून सभापतींच्या निवडीपर्यंत काँग्रेसकडून राष्ट्रवादीला डावलले गेले. ही खदखद राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ सदस्यांनी एका पत्रपरिषदेच्या माध्यमातून जाहीररीत्या व्यक्त केली.

नागपूर जिल्हा परिषदेतील राजकारण : गृहमंत्र्यांचे पुत्र काँग्रेसवर नाराज
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपाध्यक्षाच्या निवडीपासून सभापतींच्या निवडीपर्यंत काँग्रेसकडून राष्ट्रवादीला डावलले गेले. ही खदखद राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ सदस्यांनी एका पत्रपरिषदेच्या माध्यमातून जाहीररीत्या व्यक्त केली. सत्ताधाऱ्यांचा एककल्ली कार्यक्रम खपवून घेणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीने मांडली. वेळ पडल्यास राष्ट्रवादीच्या सदस्य, महिला व बालकल्याण समिती सभापती उज्ज्वला बोढारे यांनाही विरोध करू असे सांगून अप्रत्यक्षरीत्या बोढारेंवरील रोषही व्यक्त केला.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तिकीट वाटपापासून ते पदांच्या वाटपापर्यंत अशा सर्वच ठिकाणी काँग्रेसने राष्ट्रवादीची बोळवण केली. बोढारे यांना सभापतिपद मिळाले असले तरीसुद्धा त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजी असल्याचे दिसून आले आहे. आज राष्ट्रवादीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ सदस्य शेखर कोल्हे म्हणाले, आम्ही आतापर्यंत आघाडी धर्म पाळला. मात्र आता आम्ही जनतेची बाजू मांडणार आहोत. आम्ही सत्तेत आहोत मात्र जिल्हा परिषदेचा कारभार एककल्ली होऊ देणार नाही. चुका झाल्यास आम्ही विरोध करणार, जनतेची बाजू मांडणार. गरज पडल्यास महिला व बालकल्याण विभागाच्या सभापतीविरुद्ध सुद्धा भूमिका घेऊ. यावेळी सलील देशमुख म्हणाले की, आम्हाला जनतेने निवडून दिले आहे. जनतेशी आम्ही प्रामाणिक आहोत. त्यामुळे गरज पडल्यास जनतेसाठी आम्ही सभागृहात विरोधी भूमिका घेऊ. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे सदस्य दिनेश बंग, शेकापचे सदस्य समीर उमप व इतर सदस्य उपस्थित होते.
स्वीकृत सदस्य असावेत
जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य असावेत, यासाठी राष्ट्रवादीने सकारात्मक भूमिका घेतली आहे. काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य होते. नागपूर महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य आहेत. त्याच धर्तीवर जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य असावेत, अशी पक्षाची भूमिका आहे. त्यासाठी पक्षातर्फे आमसभेत प्रस्ताव मांडला जाईल, अशी माहिती यावेळी सलील देशमुख यांनी दिली.