वाडीत राजकीय पारा चढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:09 IST2021-02-09T04:09:53+5:302021-02-09T04:09:53+5:30
वाडी : जिल्ह्यात सर्वात मोठ्या नगर परिषदेपैकी एक असलेल्या वाडी नगर परिषद क्षेत्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला ...

वाडीत राजकीय पारा चढतोय
वाडी : जिल्ह्यात सर्वात मोठ्या नगर परिषदेपैकी एक असलेल्या वाडी नगर परिषद क्षेत्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. वाडी नगर परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणीचा सध्याचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. मार्चच्या अंतिम आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात न.प.ची दुसरी सार्वत्रिक निवडणूक होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरात निवडणूकपूर्व वातावरण निर्मितीला सर्वच राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. वाडी ग्रामपंचायतचे २५ ऑगस्ट २०१४ मध्ये नगर परिषदेत रूपांतर झाले. नगर परिषदेच्या २५ प्रभागाची सार्वत्रिक निवडणूक २२ एप्रिल २०१५ ला संपन्न झाली. तीत निकालानंतर भाजप (१०), काँग्रेस (०१), राष्ट्रवादी (०४), शिवसेना (०२), बसपा (०६) तर २ जागेवर अपक्ष नगरसेवक विजयी झाले. न.प.मध्ये भाजपाला सर्वाधिक जागा असल्या तरी, पहिल्या टर्ममध्ये नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने संबंधित संवर्गातून विजयी झालेल्या काँग्रेसच्या नगरसेवकाला नगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली. पाच वर्षांच्या काळात नगर परिषदेत अनेक उलथापालथ झाली. विकास कामाकरिता अनेकवेळा सभागृहात संघर्ष पाहायला मिळाला. पक्षीय अदलाबदलही झाली. २० मे २०२० रोजी पहिल्या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपला. मात्र लॉकडाऊनमुळे निवडणुका लांबल्याने न.प.चा कार्यभार जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रशासकाकडे सोपविण्यात आला. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. यासोबतच १२९ ग्रा.पं.च्या निवडणुका अलीकडेच पार पडल्याने नगर परिषद निवडणुकांची चाहूल लागली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात विविध राजकीय पक्षाच्या वतीने मेळावे, सत्कार समारंभ आयोजित केले जात आहेत.