Political arena will be held in Nagpur district | नागपूर जिल्ह्यात रंगणार राजकीय आखाडा
नागपूर जिल्ह्यात रंगणार राजकीय आखाडा

ठळक मुद्देसत्ता टिकविण्याचे भाजप-सेनेपुढे आव्हानबदलत्या राजकीय स्थितीचा फटका कुणाला ?विधानसभेतील विजयकाँग्रेस-राष्ट्रवादी कॅश करणार का?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अडीच वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर नागपूर जिल्हा परिषदेचानिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. आरक्षणाची टक्केवारी वाढल्यामुळे जि.प.ची निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेत खोळंबली होती. अद्यापही आरक्षणाबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र राज्य निवडणुक आयोगाला न्यायालयाकडून मिळालेल्या निर्देशानुसार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय आखाडा रंगणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. भाजपा-शिवसेनेत काडीमोड झाला आहे. नागपूर जि.प.त भाजप आणि शिवसेनेची सत्ता होती. आता जि.प.ची निवडणूक हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढतील. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीत मिळालेले यश जि.प.मध्ये कॅश करण्याची संधी चालून आली आहे. असे असले तरी मतदानाचा दिवस येईपर्यंत राज्यातील राजकीय परिस्थिती कशी राहील, यावरून नागपूर जिल्हा परिषदेतही सत्तासमीकरण ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नागपूर जिल्हा परिषदेत ५८ सर्कल आहेत. २०१२ च्या निवडणुकीत सर्कलची संख्या ५९ होती. यानंतर वाडी ग्राम पंचायतीला नगर परिषदेचा दर्जा मिळाल्याने जि.प.चे एक सर्कल कमी झाले. यासोबतच पारशिवनी नगरपंचायत, वानाडोंगरी आणि बुटीबोरी नगर परिषदेची निर्मिती झाल्यानंतर जि.प.सर्कलच्या रचनेतही बदल करण्यात आला. यात काही सर्कलची नावेही बदलण्यात आली आहे.
२०१२ मध्ये भाजपाने ५९ पैकी २२ जागावर विजय मिळविला होता तर कॉँग्रेस (१९), शिवसेना (८), राष्ट्रवादी (७), बसपा, रिपाई आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला होता. निवडणूक निकालानंतर सत्तास्थापन करताना पहिल्या अडीच वर्षासाठी भाजपाने राष्ट्रवादीशी हात मिळविणी केली होती. यात भाजपाला अध्यक्ष तर राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद मिळाले होते. नंतर शेवटच्या अडीच वर्षात भाजप-शिवसेनेने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. यात भाजपाला अध्यक्षपद तर शिवसेनेला उपाध्यक्षपद मिळाले होते. २० मार्च २०१७ मध्ये जि.प.चा कार्यकाळ संपला. मात्र सर्कल आरक्षणाचा वाढल्यामुळे हा वाद न्यायालयात पोहोचला. यातच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यास विलंब होत असल्याने सरकारने जि.प.च्या कार्यकाळाला मुदतवाढ दिली. पुढे आरक्षणाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. न्यायालयाने सरकारला फटकारल्यानंतर सरकारने जि.प.बरखास्त करीत १८ जुलै २०१९ रोजी प्रशासकाची नेमणूक केली होती.

आमदारांचीही परीक्षा
विधानभा निवडणूक निकालानंतर जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीत बदल झाला आहे. जिल्ह्यात सावनेर आणि उमरेड मतदार संघात काँग्रेस तर काटोलमध्ये राष्ट्रवादीला यश मिळाले आहे. या तीन मतदार संघात जि.प.चे २७ सर्कल येतात. त्यामुळे या सर्कलमध्ये विजय मिळवूण देण्याची जबाबदारी आमदारावरही राहणार आहे. यासोबतच हिंगणा आणि कामठी मतदार संघात भाजपालाही यश मिळाले आहे. त्यामुळे या मतदार संघात मोडणारे जि.प.सर्कल आणि जिल्ह्यात भाजपाची शाबूत ठेवण्याचे आवाहन सत्ताधारी पक्षाला असणार आहे.

शिवसेनेच्या अस्त्विाची लढाई
२०१२ च्या निवडणूकीत जि.प.त शिवसेनेचे ८ सदस्य विजयी झाले होते. विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेची युती होती. जागा वाटपात शिवसेनेला जिल्ह्यात एकही जागा मिळाली नाही. जिल्ह्यात काटोल आणि रामटेकच्या जागेसाठी शिवसेना अखेरपर्यंत आग्रही होती. शेवटी रामटेक मतदार संघात शिवसेनेचे अ‍ॅड.आशिष जयस्वाल यांनी बंडखोरी केली. विधानसभेत जयस्वाल मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यामुळे जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेचे प्रभावक्षेत्र असलेल्या जि.प.सर्कलमध्ये भाजप-सेनेत तगडी लढत होण्याची शक्यता आहे.

जि.प.चे सध्याचे पक्षीय बलाबल
भाजपा - २१
काँग्रेस - १९
शिवसेना - ८
राष्ट्रवादी - ७
रिपाई - १
बसपा - १
गोगपा - १

या सर्कलमधून मिळणार अध्यक्ष
राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत नुकताच निघाली आहे. नागपूर जि.प. मध्ये अध्यक्षपद अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव झाले आहे. जिल्ह्यात अनुसूचित जमाती (महिला) यांच्यासाठी बेलोना , टेकडी कोळसा खदान, सोनेगाव निपाणी , बेसा व नांद हे सर्कल आरक्षित आहे. त्यामुळे या सर्कलमधुन निवडून येणाऱ्या महिला सदस्य अध्यक्षपदासाठी दावेदार ठरू शकतात. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाकडून या सर्कलमध्ये दमदार उमेदवार देण्याची शक्यता आहे.

Web Title: Political arena will be held in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.