पोलिसांचा अनोखा ‘मोबाईल व्हॅलेन्टाईन डे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:09 IST2021-02-14T04:09:50+5:302021-02-14T04:09:50+5:30
अलीकडे मोबाईल हा प्रत्येकाचाच ‘जिवलग’ झाला आहे. तो जवळ नसला की माणूस (स्त्री असो की पुरुष) अस्वस्थ होतो. मोबाईल ...

पोलिसांचा अनोखा ‘मोबाईल व्हॅलेन्टाईन डे’
अलीकडे मोबाईल हा प्रत्येकाचाच ‘जिवलग’ झाला आहे. तो जवळ नसला की माणूस (स्त्री असो की पुरुष) अस्वस्थ होतो. मोबाईल हरविला किंवा चोरीला गेला तर संबंधित व्यक्तीची अवस्था शब्दातीत असते. या अवस्थेची कारणे वेगवेगळी असली तरी मोबाईलमधील महत्त्वाचा डाटा, संपर्क क्रमांक, फोटोच्या रूपातील मधुर आठवणी ही तीन समान कारणे अस्वस्थतेत दडलेली असतात. नको ती माहिती, फोटो, अथवा व्हिडिओ आणि मेसेज दुसऱ्याच्या नजरेस पडू नयेत, हेदेखील एक कारण असते. त्यामुळे मोबाईल हरविलेल्या किंवा चोरीला गेलेल्या व्यक्तीची अवस्था काही वेळेसाठी का होईना वेडापिसा झाल्यासारखी असते. लगेच त्याला त्याचा फोन मिळाला तर तो आनंदही काही औरच असतो. ते ध्यानात घेत गुन्हे शाखा सायबर ठाण्यातील पोलिसांनी १११ जणांचे मोबाईल शोधून त्यांना व्हॅलेन्टाईन पर्वावर १३ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता पोलीस जिमखान्यात हजर राहण्याचे आवाहन केले होते. त्याला अनुसरून अनेक मोबाईलधारक आपले मोबाईल परत घेण्यासाठी हजर राहिले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, ईओडब्ल्यूचे उपायुक्त विवेक मासाळ आणि सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अशोक बागुल यांच्या हस्ते हे मोबाईल संबंधित व्यक्तींना परत करण्यात आले.
---
गृहमंत्र्यांकडून प्रशंसा
पोलिसांच्या या उपक्रमाची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रशंसा केली. अशा उपक्रमामुळे पोलीस आणि नागरिकांमध्ये प्रेम आणि विश्वासाचे संबंध निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त करणारे ट्विट देशमुख यांनी केले.
---