एमआयच्या आॅपरेशनबाबत नागपुरात फोन करणा-यांकडे पोलिसांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 23:19 IST2018-11-12T23:16:35+5:302018-11-12T23:19:36+5:30
मिलिटरी इंटेलिजन्सच्या ‘चर्चित आॅपरेशन’ची माहिती गणेशपेठ पोलिसांना कळवून नागपूरसह देशभरातील सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडवून देणा-या व्यक्तीकडे नागपूर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्वभूमीवर, कांगडा (हिमाचल प्रदेश) आणि भद्रावती (जि. चंद्रपूर) येथे विशेष शाखेची तसेच एटीसीची पथके चौकशीसाठी जाणार आहे. सोबतच हैदराबाद (तेलंगणा) कडेही पोलीस चौकशी करणार आहेत. दरम्यान, नागपुरातील आॅपरेशनबाबत अजूनही कुणी स्पष्ट इन्कार किंवा होकार द्यायला तयार नाहीत. त्यामुळे आॅपरेशनबाबत अजूनही संभ्रमाचीच स्थिती आहे.

एमआयच्या आॅपरेशनबाबत नागपुरात फोन करणा-यांकडे पोलिसांचे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिलिटरी इंटेलिजन्सच्या ‘चर्चित आॅपरेशन’ची माहिती गणेशपेठ पोलिसांना कळवून नागपूरसह देशभरातील सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडवून देणा-या व्यक्तीकडे नागपूर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्वभूमीवर, कांगडा (हिमाचल प्रदेश) आणि भद्रावती (जि. चंद्रपूर) येथे विशेष शाखेची तसेच एटीसीची पथके चौकशीसाठी जाणार आहे. सोबतच हैदराबाद (तेलंगणा) कडेही पोलीस चौकशी करणार आहेत. दरम्यान, नागपुरातील आॅपरेशनबाबत अजूनही कुणी स्पष्ट इन्कार किंवा होकार द्यायला तयार नाहीत. त्यामुळे आॅपरेशनबाबत अजूनही संभ्रमाचीच स्थिती आहे.
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या दोन एजंटसना शुक्रवारी तर एका पाकिस्तानी नागरिकाला शनिवारी नागपुरात मिलिटरी इंटेलिजन्सने पकडल्याचे वृत्त पुढे आले होते. या वृत्ताने देशभरातील सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडवून दिली होती. नागपुरात या संबंधाने उलटसुलट चर्चेला उधाण आले असताना रविवारी (११ नोव्हेंबर) नागपूर विमानतळाला अतिसुरक्षेचा (हाय अलर्ट) ईशारा मिळाला आहे. त्यामुळे देशभरातील सुरक्षा यंत्रणांचे नागपूरकडे लक्ष वेधले गेले. नागपुरात विशेष आॅपरेशन करून आयएसआय एजंटसह पाकिस्तानी नागरिकाला पकडण्यात आल्याच्या वृत्ताबाबत उलटसुलट चर्चा आणि घडामोडी सुरू झाल्या. त्यामुळे स्थानिक पोलिसांची पुरती तारांबळ उडाली. ज्या फोन कॉल्सवरून ‘आॅपरेशन आयएसआय एजंट’चे वृत्ताला वाचा फुटली, तो फोनकॉल हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातून पंकज येरगुडे नामक व्यक्तीच्या मोबाईलवरून आला होता, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. गणेशपेठ पोलिसांना फोन करणारांनी स्वत:ला मेजर पंकज बोलतो आहे, असे सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी त्या फोन कॉल्सचा डाटा काढला आहे. त्यात हा फोन पंकज यांचाच असून ते मुळचे भद्रावती येथील आहेत आणि ते कांगडा येथे असल्याचे स्पष्ट झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, पंकज यांच्याशी संबंधित एक फोन कॉल हैदराबाद (तेलंगणा)चाही आहे. त्यामुळे पोलिसांनी या एकूणच प्रकरणाची पार्श्वभूमी शोधून काढण्यासाठी विशेष शाखेची पथके कांगडा, भद्रावती आणि हैदराबादमध्ये पोहचून चौकशी करणार आहे.
४८ तासात होणार खुलासा
यासंबंधाने पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि तातडीने या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्याचे निर्देश दिले. दरम्यान, ज्या पद्धतीने पंकज यांनी गणेशपेठ पोलिसांना फोन केला ते बघता आणि त्यांचा एकूणच बोलण्याचा अंदाज बघता ते सैन्यदलाशी संबंधित असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. कांगडाजवळ असलेले सैन्यदलाचे तळ (कॅम्प) लक्षात घेता त्याला पुष्टी मिळाली आहे. त्यामुळे नागपुरात नेमके काय झाले, फोन करण्यामागचा काय उद्देश होता, आॅपरेशन झाले की नाही, त्याचा खुलासा पुढच्या ४८ तासांच्या आत होऊ शकतो. हा खुलासा नागपूर, मुंबई किंवा दिल्ली येथूनही केला जाऊ शकतो, असे सूत्रांचे सांगणे आहे.