Police vacations canceled from today: Heavy bandobast in sub-capital | पोलिसांच्या सुट्या आजपासून रद्द : उपराजधानीत चोख बंदोबस्त
पोलिसांच्या सुट्या आजपासून रद्द : उपराजधानीत चोख बंदोबस्त

ठळक मुद्देईद-ए-मिलाद आणि अयोध्या निकाल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १० नोव्हेंबरला ईद-ए-मिलाद आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात अयोध्याचा निकाल येण्याची शक्यता असल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेत कोणतीही बाधा येऊन नये म्हणून पोलिसांनी पूर्ण तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्वच ठिकाणच्या पोलिसांच्या सुट्या ५ नोव्हेंबरपासून रद्द करण्यात आल्या आहेत़ तसेच आदेश पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून शनिवारी रात्री सर्व पोलीस आयुक्त, अधीक्षकांना तसेच घटकप्रमुखांना देण्यात आले आहे़ नागपुरातही कोणताच अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत.
सरकार स्थापन करण्याच्या विषयावरून राज्यात एक वेगळे राजकीय वातावरण निर्माण झाले आहे़ चार दिवसांवर ईद-ए-मिलादचा सण आला आहे. तर, त्यानंतर एकाच आठवड्यात देश-विदेशाचे लक्ष लागलेला अयोध्या प्रकरणाचा निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबईत शनिवारी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला़ त्यानंतर सर्वांना अतिसतर्कतेच्या उपाययोजना आखण्याचे आदेश देण्यात आले. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे ऐनवेळी धावपळ नको म्हणून पुढच्या आदेशापर्यंत पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना रजा देण्यात येऊ नये, जे रजेवर गेलेले आहेत, त्यांना बोलवून घ्यावे, असे सूचनावजा आदेशही देण्यात आले आहेत.
नागपूर हे देशाचे हृदयस्थळ आहे. संघ मुख्यालय, दीक्षाभूमी या अतिमहत्त्वाच्या स्थळांमुळे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गृहनगर म्हणूनही नागपूर शहराची देशात वेगळी ओळख आहे. सर्वधर्मसमभाव जपणारे शहर म्हणून नागपूरची ओळख आहे. मात्र, अधूनमधून येथे घडणाºया घडामोडीही लक्षवेधी असतात. देशाच्या सुरक्षेत अतिमहत्त्वाचे स्थान असलेल्या ब्रह्मोस प्रकल्पातील एका अभियंत्याला पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली गेल्या वर्षी अटक झाली होती. त्यात देशभर खळबळ निर्माण करणाºया लखनौच्या (उत्तर प्रदेश) कमलेश तिवारी हत्याकांडात लखनौ तसेच स्थानिक एटीएसने सईद आसिम नामक तरुणाला अटक केली. अयोध्या निकालानंतरही काही उपद्रवी मंडळी अफवा पसरवून सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात, अशा गुप्त सूचना आहेत. त्यामुळे शहर आणि जिल्हा पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सोमवारी शांतता समितीची बैठक घेऊन शहराच्या प्रतिष्ठेला समाजकंटकाकडून गालबोट लावले जाणार नाही, यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली.

सर्व काही सुरळीत : पोलीस आयुक्त
पोलिसांनी खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होणार नाही. कोणत्या समाजकंटकाकडून तसा प्रयत्न झाला तर त्याला धडा शिकविण्यासाठी शहर पोलीस सज्ज आहेत. मात्र, तशी वेळ नागपुरात येणार नाही. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक मानले जाणारे शहर म्हणून देशात नागपूरची ख्याती आहे. येथील सर्वच जाती-धर्मातील मंडळी एकोप्याने राहतात. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नसल्याचा विश्वास पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

Web Title: Police vacations canceled from today: Heavy bandobast in sub-capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.