सोशल मीडियावरील आक्षेपार्ह व्हिडीओवर लक्ष ठेवणार पोलिसांची ‘गरूडदृष्टी’
By योगेश पांडे | Updated: March 8, 2025 00:40 IST2025-03-08T00:40:44+5:302025-03-08T00:40:59+5:30
परिमंडळ पाचमध्ये सुरुवात.

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह व्हिडीओवर लक्ष ठेवणार पोलिसांची ‘गरूडदृष्टी’
योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सबकुछ ऑनलाईनच्या युगात लाईक्स व शेअर मिळविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जात अनेकदा आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करण्यात येतात. त्यामुळे काही वेळा कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होण्याचा धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी ‘गरुडदृष्टी’ या उपक्रमाची सुरुवात केली आहे. याअंतर्गत सोशल मीडियावरील आक्षेपार्ह व्हिडीओवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. परिमंडळ पाचमध्ये याची सुरुवात करण्यात आली आहे.
अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह, अश्लिल व्हिडीओ पोस्ट करण्यात येतात. काही गुन्हेगार दहशत निर्माण करणे व जनतेत भिती पसरविण्यासाठीदेखील व्हिडीओ पोस्ट करतात. मागील काही दिवसांत कुख्यात गुंड राजा गौस, पुण्याती गजा मारणे, सुमित ठाकूर यांनी अशा पद्धतीने व्हिडीओ पोस्ट केले. असे प्रकार समाजात तेढदेखील निर्माण करू शकतात. यासंदर्भात परिमंडळ पाचच्या पथकाने पुढाकार घेतला आहे. सायबर पथकाच्या मदतीने गरुडदृष्टी नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत अशा व्हिडीओवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांचा शोध घेण्यात येणार आहे. जर आरोपी अल्पवयीन असेल तर पालकांना सूचनापत्र देण्यात येईल. व्हिडीओ काय आहे याच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात येईल.
सोशल मीडियावर नागरिकांना असे कुठले व्हिडीओ आढळले तर जवळील पोलीस ठाण्यात कळवावे असे आवाहन पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी केले आहे.