पोलिसाचा मुलीवर बलात्कार

By Admin | Updated: June 8, 2014 00:49 IST2014-06-08T00:49:52+5:302014-06-08T00:49:52+5:30

कर्तव्याला बुट्टी देऊन एका पोलीस शिपायानेच १४ वर्षीय मुलीवर चक्क पोलीस मुख्यालयात (कर्मचारी वसाहत) बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेने

Police rape rape | पोलिसाचा मुलीवर बलात्कार

पोलिसाचा मुलीवर बलात्कार

यवतमाळ : कर्तव्याला बुट्टी देऊन एका पोलीस शिपायानेच १४ वर्षीय मुलीवर चक्क पोलीस मुख्यालयात (कर्मचारी वसाहत) बलात्कार केल्याची  संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेने जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सदर पोलीस शिपाई येथील चार्ली पथकात कार्यरत असून मुख्यालयातील शासकीय निवासस्थानात राहतो. शुक्रवारी रात्री येथील शनी मंदिर चौकात तो  इतर सहकार्‍यांसोबत कर्तव्यावर होता. दरम्यान, सहकारी पोलीस कर्मचार्‍यांना विश्‍वासात  घेऊन कर्तव्यावरून बुट्टी मारली. त्यानंतर ओळखीतीलच  एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी सोडून देण्याच्या बहाण्याने तहसील चौकातून दुचाकीवर बसविले. पोलीस मुख्यालयातील राहत्या शासकीय  निवासस्थानी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. शनिवारी सकाळी १0 वाजता तिला घराच्या परिसरात सोडूनही दिले.
इकडे रात्रभर मुलगी घरी न आल्याने नातेवाईक शोधाशोध करीत होते. मुलगी घरी आल्यानंतर नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. कसेबसे स्वत:ला  सावरत मुलीने आपबिती कथन केली. मात्र बदनामीच्या भीतीने ते पोलिसात जावे की नाही, या संभ्रमावस्थेत होते. अखेर सायंकाळी ६ वाजता पीडित  मुलगी आणि तिचे नातेवाईक वडगाव रोड पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी रितसर तक्रार दिली. मात्र प्रकरण पोलीस शिपायाचे असल्याने  कर्तव्यावरील पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी त्यांची समजूत काढीत त्यांना बसवून ठेवले. सदर शिपायाला  समक्ष पाचारण करून मुलगी आणि  तिच्या नातेवाईकांचे म्हणणे जाणून घेतले.
सुरूवातीला तक्रार करू नये म्हणून पोलीस अधिकार्‍यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रात्री ८.३0 वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.  मात्र वैद्यकीय तपासणीअंती गुन्हा नोंदविला जाणार असल्याचे एका जबाबदार पोलीस अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला  सांगितले. यवतमाळचे एसडीपीओ राहुल मदने आणि जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क केला, मात्र  प्रतिसाद मिळाला नाही. (स्थानिक प्रतिनिधी)
 

Web Title: Police rape rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.