नागपुरातील हुक्का पार्लरचे परवाने रद्द करण्याची पोलिसांची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 23:06 IST2018-02-12T23:04:22+5:302018-02-12T23:06:03+5:30
दोन वर्षांत ज्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली, त्यांचे परवाने रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.

नागपुरातील हुक्का पार्लरचे परवाने रद्द करण्याची पोलिसांची तयारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन वर्षांत ज्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली, त्यांचे परवाने रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
पोलीस महासंचालक कार्यालयातून हुक्का पार्लर संबंधाने एक आदेशपत्रक राज्यातील सर्व ठिकाणच्या पोलिसांना दोन दिवसांपूर्वी मिळाले. त्यात हुक्का पार्लरवरील कारवाईचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, हुक्का पार्लर ज्या इमारतीत सुरू आहे, त्या ठिकाणी कोणती आणि कशी कारवाई करावी, त्यासंबंधाची सूचना आहे. कारवाईनंतर ज्या विभागांनी हुक्का पार्लरच्या इमारतींना परवाने (इटिंग लायसेन्स, गुमास्ता आदी) दिले. त्यांच्याकडे कारवाईचा अहवाल पाठवून तो परवाना रद्द करण्यासंबंधीचा पाठपुरावा करण्यासंबंधीच्या सूचना आहेत. त्याचा आधार घेत विविध विभागांसोबत पोलीस समन्वय करून हुक्का पार्लर बंद करण्याबाबत पावले उचलले जाणार आहेत. अल्पवयीन मुलांना प्रवेश देऊन हुक्क्याचा धूर उडविणाऱ्या, गेल्या दोन वर्षात ३० पेक्षा जास्त हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेतर्फे कारवाई करण्यात आली आहे, हे विशेष !