विकृतीचा कळस! नागपुरात श्वानावर लैंगिक अत्याचार; विकृताला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2022 18:28 IST2022-12-16T18:17:15+5:302022-12-16T18:28:19+5:30
हुडकेश्वरमधील घटना : श्वानप्रेमींमध्ये संताप

विकृतीचा कळस! नागपुरात श्वानावर लैंगिक अत्याचार; विकृताला अटक
नागपूर : वासनेच्या भरात व्यक्ती कोणत्या थराला जाईल याचा नेम नसतो व यातूनच अनेकदा विकृतपणा घडतो. नागपुरातील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने सार्वजनिक बगिच्यात चक्क एका श्वानावर लैंगिक अत्याचार केले. या किळसवाण्या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिस ‘ॲक्शन मोड’मध्ये आले व त्यांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
शाहूनगर परिसरातील एका बगिच्यात हा प्रकार घडला. भर दुपारी त्याने हा अत्याचार केला. परिसरातील एका तरुणाने त्याचा व्हिडीओ बनविला. खेळणाऱ्या काही तरुणांनी त्याला टोकल्यावर त्याने तेथून पळ काढला. तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली व परिसरात खबऱ्यांच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला.
हातमजुरीचे काम करणारा देवेंद्र गणपत भगत (४०, शाहूनगर चौक) असे त्याचे नाव असल्याची माहिती कळली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तो मूळचा मध्यप्रदेश येथील बालाघाट जिल्ह्यातील कोथुलना गावचा आहे. कामाच्या शोधात तो नागपूरला आला होता. त्याचे कुटुंबीय गावाकडेच आहेत. पोलिसांनी त्याच्याविरोधात भा.दं.वि.च्या कलम २९४, ३७७ यांसह प्राणी क्रूरता संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला.