बनावट बियाणे प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी
By Admin | Updated: June 8, 2014 00:50 IST2014-06-08T00:50:44+5:302014-06-08T00:50:44+5:30
बनावट बियाणे विक्री प्रकरणी अटकेत असलेल्या बोथली (टाकळी) येथील तीन आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तीनही अरोपींना ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बनावट बियाणे प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी
९ जूनपर्यंत मुदत : धागेदोरे पुसदपर्यंत
सेलू : बनावट बियाणे विक्री प्रकरणी अटकेत असलेल्या बोथली (टाकळी) येथील तीन आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तीनही अरोपींना ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सेलू पोलीस आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त कारवाईत गुरुवारी झडशी नजीकच्या बोथली येथे बनावट बियाणे निर्मितीचा अवैध व्यवसाय उघडकीस आला. या व्यवसायात सहभागी असणारे आरोपी शंकर बखाराम जिकार (६0), त्याचा मुलगा नितीन शंकर जिकार (२५) व जावई गणेश किसन जांभुळकर (३२) या तिघांना पोलिसांनी घटनास्थळावरुन अटक केली. शेतकर्यांची फसवणूक केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला. शुक्रवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस चौकशीत आरोपींनी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील चंदू राठोड याचा या व्यवसायात सहभाग असल्याचे सांगितल्यावरून कृषी विभागाचे एक पथक तेथे दाखल झाले. तसेच चंदू राठोड याच्यावर कारवाई करीत पुसद येथील पोलीस ठाण्यात त्याच्याविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. चंदू राठोडला सेलू येथील पोलिस ठाण्यात आणून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे सेलू पोलिसांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)