सरन्यायाधीशांच्या आईची फसवणूक करणाऱ्यास १६ पर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 10:57 AM2020-12-10T10:57:00+5:302020-12-10T10:57:52+5:30

Nagpur News crime देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या वयोवृद्ध आईची अडीच कोटी रुपयाने फसवणूक करणारा तापस घोष याने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हे कृत्य केले.

Police custody up to 16 for cheating Chief Justice's mother | सरन्यायाधीशांच्या आईची फसवणूक करणाऱ्यास १६ पर्यंत पोलीस कोठडी

सरन्यायाधीशांच्या आईची फसवणूक करणाऱ्यास १६ पर्यंत पोलीस कोठडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या वयोवृद्ध आईची अडीच कोटी रुपयाने फसवणूक करणारा तापस घोष याने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हे कृत्य केले. केवळ तीन ते चार वर्षाच्या काळातच त्याने बोगस बिल बनवून लोकांकडून वसूल केलेली रक्कम हडपली. ही रक्कम तब्बल अडीच कोटी रुपये इतकी आहे. पोलिसांनी आज आरोपीला न्यायालयासमोर सादर करून १६ डिसेंबरपर्यंत ताब्यात घेतले आहे.

तापसने पत्नीच्या मदतीने सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आई मुक्ता बोबडे यांची अडीच कोटी रुपयाने फसवणूक केली. लोकमतने बुधवारच्या अंकात हे प्रकरण उघडकीस आणले होते. तापस १३ वर्षांपासून बोबडे परिवाराशी जुळला आहे. तो मॅनेजरच्या पदावर कार्यरत होता. तो बोबडे परिवाराच्या लॉनचे कामही सांभाळायचा. ९४ वर्षीय मुक्ता बोबडे यांना वयोमानानुसार सर्व व्यवहार पाहता येत नसल्याने तापस हाच लॉनचा आर्थिक व्यवहार पाहायचा. त्याला नऊ हजार रुपये मासिक वेतन आणि प्रत्येक बुकिंगवर २५०० रुपये कमिशन मिळत होते. लग्नसमारंभाच्या बुकिंगद्वारे मिळणारी रक्कम बँक खात्यात जमा करणे, लॉनच्या देखरेखीवर होणारा खर्च आणि मुक्ता बोबडे यांचे खाते संचालित करण्याचे काम तापस हा करीत हाेता. तापसने अनेक बुकिंगची नोंद न करता त्याची रक्कम परस्पर हडपली. तसेच अनेक बुकिंगची रक्कमसुद्धा खात्यात जमा न करता ती परस्पर लंपास करीत होता. तापसने फेब्रिकेशन आणि इतर खर्चाचे बोगस बिल बनवून लाखो रुपये लाटले. इतकेच नव्हे तर लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांनी लॉनची बुकिंग रद्द केली होती. तापसने अशा लोकांचे पैसे परत करण्याचे सांगून खात्यातून पैसे काढले. परंतु जितके पैसे काढले त्यातील मोठी रक्कम स्वत:जवळच ठेवून घेतली. लॉकडाऊननंतर तापस नियमित खर्चासाठीही त्याच्याकडे पैसे नसल्याचे सांगायचा. बोबडे परिवाराने त्याला हिशेब मागितला असता तो टाळाटाळ करू लागला. तेव्हापासून त्याच्यावर बोबडे परिवाराला संशय आला.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, २९ ऑगस्ट रोजी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी याची कसून चौकशी केली. यात तापस आणि त्याच्या पत्नीने साथीदारांच्या मदतीने फसवणूक केल्याचे उघडकीस आले. या आधारावर मंगळवारी रात्री सीताबर्डी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ४०९, ४६७, ४७०, ४७१ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Police custody up to 16 for cheating Chief Justice's mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.