नैराश्यातून पोलिस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2022 18:50 IST2022-12-17T18:50:06+5:302022-12-17T18:50:58+5:30
Nagpur News पत्नीचे निधन झाल्यामुळे गेल्या वर्षभरापासून नैराश्यात असलेल्या बेलतरोडी पोलिस ठाण्यातील पोलिस शिपायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रघुजीनगर पोलिस क्वाॅर्टरमध्ये शनिवारी सकाळी उघडकीस आली.

नैराश्यातून पोलिस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या
नागपूर : पत्नीचे निधन झाल्यामुळे गेल्या वर्षभरापासून नैराश्यात असलेल्या बेलतरोडी पोलिस ठाण्यातील पोलिस शिपायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रघुजीनगर पोलिस क्वाॅर्टरमध्ये शनिवारी सकाळी उघडकीस आली.
संतोष वानखेडे असे आत्महत्या करणाऱ्या पोलिस शिपायाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष यांची सुरुवातीला लोहमार्ग पोलिसात नियुक्ती झाली होती. त्यानंतर ते शहर पोलिसात आले. सध्या ते बेलतरोडी पोलिस ठाण्यात नायक पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होते. संतोषचे आई-वडील यवतमाळ येथे राहतात. त्यांची पत्नी मध्य रेल्वेत कार्यरत होती. परंतु गेल्यावर्षी आजारामुळे त्यांच्या पत्नीचे निधन झाले. पत्नीच्या निधनापासून संतोष नैराश्यात होते. त्यांना १२ वर्षांचा मुलगा असून तो त्यांच्या आईवडिलांकडे यवतमाळ येथे राहतो.
संतोष हे एकटेच रघुजीनगर पोलिस क्वाॅर्टरमध्ये रहायचे. सर्वांशी मिळूनमिसळून राहत असल्यामुळे संतोषचे पोलिसांशी चांगले संबंध होते. शनिवारी त्यांची अधिवेशनात ड्यूटी लावण्यात आली होती. परंतु ते बेलतरोडी ठाण्यात ड्यूटीवर हजर न झाल्यामुळे ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. तो कर्मचारी संतोषच्या क्वाॅर्टरवर गेला असता त्याला संतोष गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
..............