नागपुरातील जुगार अड्ड्यावरून पोलीस आयुक्तांची फटकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:20 IST2018-01-17T00:11:57+5:302018-01-17T00:20:18+5:30
जुगार अड्ड्यावरून झालेल्या गँगवॉरमध्ये सारंग मदने याची हत्या झाली. हे प्रकरण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या साप्ताहिक बैठकीत उमटले. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी गिट्टीखदान ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला फटकारत सारंग हत्याकांडाची माहिती विचारली.

नागपुरातील जुगार अड्ड्यावरून पोलीस आयुक्तांची फटकार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुगार अड्ड्यावरून झालेल्या गँगवॉरमध्ये सारंग मदने याची हत्या झाली. हे प्रकरण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या साप्ताहिक बैठकीत उमटले. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी गिट्टीखदान ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला फटकारत सारंग हत्याकांडाची माहिती विचारली.
६ जानेवारीला रात्री गिट्टीखदान येथील बोरगावस्थित दिनशा फॅक्टरी चौकात कुख्यात मटका-सट्टाकिंग गणेश ऊर्फ घुई चाचेरकर याने आपल्या साथीदाराच्या मदतीने सारंग मदने याची हत्या केली होती. घुईचे जुगार व मटक्याचे अड्डे होते. त्यावरून सारंग हा घुईला धमकावीत होता. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू होते. पोलिसांनी १ जानेवारीला सट्ट्याची खायवाडी करताना पकडलेल्या आरोपीच्या बयानावरून घुई याला ठाण्यात बोलाविले होते. तेव्हा घुई याने त्याच्या विश्वासातील पोलीस कर्मचाऱ्यापुढे सारंग याची हत्या केल्याचा खुलासा केला होता. मंगळवारी झालेल्या पोलिसांच्या साप्ताहिक बैठकीत पोलीस आयुक्तांनी गिट्टीखदान ठाण्याचे निरीक्षक यांच्याकडे घुईच्या संदर्भात विचारणा केली. त्यांनी घुईची माहिती गिट्टीखदान पोलिसांना नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. आयुक्तांनी पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वाढलेल्या गुन्ह्यांची रोकथांब करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पावले उचलण्याचा इशारा पोलीस निरीक्षकांना दिला.
रस्ते अपघातावरही आळा बसावा
रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांना पुढाकार घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. २०१६ मध्ये रस्ते अपघातात ३२० लोकांचा मृत्यू झाला होता. २०१७ मध्ये मृत्यूचा आकडा २३८ होता. आयुक्तांनी अपघातात होणाऱ्या मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले.