उपराजधानीत साकारतोय ‘पोलीस नागरिक मैत्रेय चौक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 10:47 IST2020-02-10T10:46:49+5:302020-02-10T10:47:15+5:30
पोलीस आणि संरक्षण दल हे आपल्या समाजाचे आणि देशाचे संरक्षण कुटुंबाप्रमाणे करीत असतात, याचे प्रतीक असलेली अनोखी शिल्पाकृती सेमिनरी हिल्स येथील राजभवनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आली आहे.

उपराजधानीत साकारतोय ‘पोलीस नागरिक मैत्रेय चौक’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस आणि संरक्षण दल हे आपल्या समाजाचे आणि देशाचे संरक्षण कुटुंबाप्रमाणे करीत असतात, याचे प्रतीक असलेली अनोखी शिल्पाकृती सेमिनरी हिल्स येथील राजभवनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ज्या ठिकाणी तीन प्रमुख रस्ते येऊन मिळतात त्या ठिकाणी उभारण्यात आली आहे. वनराई फाऊंडेशनद्वार२ निर्मित या शिल्पाकृतीला ‘पोलीस नागरिक मैत्रेय’चौक असे नाव देण्यात आले आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेला हा चौक अनोख्या शिल्पाकृतीमुळे नागपूरच्या सौंदर्यात भर घालणारा ठरला आहे.
पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्या हस्ते रविवारी या शिल्पाकृतीचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, वनराई फाऊंडेशनचे विश्वस्त गिरीश गांधी, नगरसेवक अॅड. निशांत गांधी, नगरसेविकास रूपा रॉय, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नीलेश भरणे, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त (वाहतूक) चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, विवेक मासाळ, विक्रम साळवी आणि पोलीस उपायुक्त निलोत्पल प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आ. विकास ठाकरे, गिरीश गांधी आणि पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या शिल्पाकृतीबद्दल आपले विचार व्यक्त केले. यावेळी वनराई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे, उपाध्यक्ष किशोर धारिया, अनंत घारड, नीलेश खांडेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन व प्रास्ताविक पोलीस निरीक्षक अशोक बागुल यांनी केले. तर पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी आभार मानले.
असे आहे शिल्प
ही शिल्पाकृती प्रतिकात्मक आहे. आपल्या देशाच्या संरक्षणासाठी जवान, सुरक्षा दल, सेनादल व पोलीस तैनात असतात. वेळ पडल्यास नागरिकांच्या संरक्षणासाठी ते आपल्या प्राणाचीही आहुती देत असतात. या सर्व बाबींचा शिल्पाकृतीत समावेश करण्यात आला आहे. या शिल्पाकृतीमध्ये मध्यभागी एक कुटुंब दर्शविले आहे. यात आई-वडील व बाजूला असलेली दोन मुले असून त्यांच्या उजव्या हातात संविधान तर डाव्या हातात कमळ हे शांतीचे प्रतीक आहे. या कुटुंबाच्या चहुबाजूला आपल्या देशाचे रक्षण करणारे पोलीस आॅफिसर, हेड कॉन्स्टेबल, ट्रॅफिक पोलीस, कमांडो, आर्मी सुरक्षा दल आपापली पोझिशन घेऊन तैनात आहेत. परिवाराच्या या शिल्पाच्या मागे महाराष्ट्र पोलिसांचा स्टार दाखवण्यात आला आहे. माजी पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम आणि गिरीश गांधी यांची ही संकल्पना असून ही अनोखी शिल्पाकृती नागपूरचे तरुण शिल्पकार निखील बोंडे व अमित पांचाळ यांनी तयार केलेली आहे. यासाठी उद्योजक सत्यनारायण नुवाल यांनी आर्थिक मदत केली आहे.