योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी महाल, हंसापुरी परिसरात झालेल्या जाळपोळ व दगडफेकीच्या घटनेनंतर याच्या मागील मास्टरमाईंडचा शोध घेण्यात येत आहे. लोकसभेची निवडणूक लढविलेल्या मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी शहराध्यक्ष फहीम खान शमीम खानवर पोलिसांची संशयाची सुई आहे. पोलिसांनी फहीम खानला ताब्यात घेतले असून विविध बाजुंनी चौकशी सुरू आहे. या प्रकरणामागे केवळ एक व्यक्ती मास्टरमाईंड होता की एखाद्या संघटनेचा यात हात होता याचा तपास सुरू आहे.
औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मुद्द्यावरून रविवारी सकाळच्या सुमारास महालच्या शिवाजी पुतळा परिसरात आंदोलन झाले होते. त्यानंतर सोशल माध्यमांवर विविध अफवा पसरल्या व सायंकाळी तरुणांच्या दोन गटांत संघर्ष झाला. काही समाजकंटकांनी या वादात प्रवेश केला व भालदापुरा, हंसापुरीत अनेक वाहनांची जाळपोळ केली. सोबतच ७५ हून अधिक वाहनांची तोडफोड करीत पोलिसांवरदेखील दगडफेक केली. त्यात ३५ हून अधिक अधिकारी-कर्मचारी जखमी झाले. अतिरिक्त कुमक मागवत भालदारपुरा, चिटणीस पार्क येथील परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली. कोम्बिंग ऑपरेशन राबवत पोलिसांनी ५० हून अधिक समाजकंटकांना ताब्यात घेतले. या प्रकरणात तीन पोलीस ठाण्यांत एकूण सहा गुन्हे दाखल झाले आहेत.
‘लोकमत’च्या हाती आलेल्या एफआयआरच्या प्रतीनुसार फहीम खान शमीम खानने (३८, संजयबाग कॉलनी, यशोधरानगर) याने विहिंप बजरंग दलाच्या आंदोलनानंतर ५० ते ६० जणांचा बेकायदेशीर जमाव जमविला व गणेशपेठ पोलीस ठाण्यात धडक दिली. त्याच्या तक्रारीवरून आंदोलन करणाऱ्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.फहीम खान शमीम खान याच्यासोबत सैफ अली खान रौफ खान (२८, वाठोडा), शेख नादीम शेख सलीम (३५, यशोधरानगर), मोहम्मद शाहनवाज रशीद शेख (२५, पारडी), मोहम्मह हरीश उर्फ मोहम्मद इस्माईल (३०, गांधीबाग), युसूफ शेख उर्फ अब्दुल हफीज (२५, महाल), शेख सादीक शेख नबी (४१, महाल), मो.युसूफ उर्फ अब्दुल हफीज शेख (महाल), आसीम शेख समशुज जमा (२४, भालदारपुरा) हेदेखील होते. पोलिसांनी गुन्हा दाखल केला व शांतता ठेवण्याबाबत समज देण्यात आली होती. मात्र असे केल्यानंतरदेखील या लोकांनी चार वाजता एका गटातील जमावाला एकत्रित करण्याचे संदेश दिले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पाचशे ते सहाशे लोक एकत्रित आले. जमाव बेकायदेशीर असून सर्वांना तत्काळ घरी जावे अशी सूचना पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांनी दिली होती. फहीम खानच्या उपस्थितीतील जमावातील लोकांनी भडकावू घोषणा देण्यास सुरुवात केली व तेथून वातावरण बिघडले.
पोलिसांच्य विरोधात घोषणाबाजीसाठी फूस
जे लोक गणेशपेठ पोलीस ठाण्यात गेले होते, त्यातील काही जणांनी ठरवून पोलिसांविरोधात घोषणाबाजी करण्यासाठी जमावाला फूस लावली. पोलिसांनीच सर्व काही केले आहे अशा अफवा पसरविल्या व आता त्यांना आम्ही दाखवतो अशी चिथावणी दिली.त्यामुळे जमाव प्रक्षोभक झाला.
फहीम खानची सखोल चौकशी सुरूयासंदर्भात पोलिसांनी फहीम खान व त्याच्या काही सहकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्याला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे. याबाबत पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांना विचारणा केली असता आम्ही मास्टरमाईंडचा शोध घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जे लोक गणेशपेठेतील बेकायदेशीर जमावात सहभागी झाले होते त्यांनी कुणाला फोन केले याचा सीडीआर काढण्यात येत आहे. तसेच याअगोदर कुठल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते का, व्हॉट्सअप किंवा सोशल माध्यमांवर त्यांनी काही पोस्ट केली होती का याचा तपास सुरू आहे. यासाठी इतर एजन्सीजचीदेखील मदत घेण्यात येत आहे. आरोपींनी एका व्यक्तीच्या इशाऱ्यावर हे काम केले की राष्ट्रीय पातळीवर एखाद्या संस्थेशी ते जुळले आहेत का याचीदेखील चौकशी सुरू असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.
फहीम खानविरोधात अगोदरपासून सहा गुन्हे
दरम्यान, फहीम खानविरोधात अगोदरपासूनच विविध प्रकारचे सहा गुन्हे दाखल आहे. हे गुन्हे २००९, २०२२, २०२३ या वर्षांत हे गुन्हे दाखल झाले होते. यात लैंगिक शोषणाचादेखील गुन्हा दाखल होता. लोकसभा निवडणूकीत त्याला १ हजार ७३ मतं मिळाली होती. तो यशोधरानगरातून गणेशपेठेत पोहोचला कसा याचा तपासदेखील सुरू आहे.