पोलीसही पकडतील गुटखा
By Admin | Updated: March 26, 2016 02:55 IST2016-03-26T02:55:21+5:302016-03-26T02:55:21+5:30
चोरांना पकडण्यासोबत आता गुटखा बंदीच्या मिशनमध्ये राज्यातील पोलीसही सहभागी होतील. प्रतिबंधित अन्नपदार्थ, गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखूवर राज्यात बंदी आहे.

पोलीसही पकडतील गुटखा
अन्न व औषध विभागासोबत करतील कारवाई : बंदी होणार अधिक प्रभावी
नागपूर : चोरांना पकडण्यासोबत आता गुटखा बंदीच्या मिशनमध्ये राज्यातील पोलीसही सहभागी होतील. प्रतिबंधित अन्नपदार्थ, गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखूवर राज्यात बंदी आहे.
मात्र गुटख्याच्या विक्रीवर चाप ठेवण्यास अन्न व औषध विभागाची यंत्रणा कमी पडते. त्यामुळे या विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कारवाईत आता स्थानिक पोलिसांची मदत मिळेल. पोलिसांनाही गुटखाबंदी मोहिमेत सामील करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. गृह विभागाचे उपसचिव सुरेश खाडे यांनी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले आहेत.
गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू इत्यादी प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्रीवर अन्न व सुरक्षा व मानके अधिनियम अंतर्गत राज्यात प्रतिबंध घालण्यात आला आहे. या प्रतिबंधित पदार्थाची विक्री व साठवणूक करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध अन्न व औषध प्रशासन व गृह विभागामार्फत संयुक्त कारवाई करणे अपेक्षित आहे. अन्न व औैषध विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या कारवाईत आवश्यक ते सहकार्य करण्याबाबत संबंधित पोलीस घटकांना सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)