नागपुरात कारच्या काळ्या काचांविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 22:39 IST2019-11-20T22:38:21+5:302019-11-20T22:39:34+5:30
काळ्या फिल्मच्या कारचा उपयोग गुन्हा करण्यासाठी करीत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. ही बाब ध्यानात ठेवून काचांवर गडद फिल्म असलेल्या कारविरुद्ध बुधवारी पोलिसांनी धडक मोहीम राबविली.

नागपुरात कारच्या काळ्या काचांविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कारमधील काळे कृत्य बाहेर दिसू नये, या उद्देशाने उपराजधानीत चारचाकी गाड्या आणि कारच्या काचांवर काळ्या फिल्म लावण्याचे प्रमाण वाढले आहे. काळ्या फिल्मच्या कारचा उपयोग गुन्हा करण्यासाठी करीत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. ही बाब ध्यानात ठेवून काचांवर गडद फिल्म असलेल्या कारविरुद्ध बुधवारी पोलिसांनी धडक मोहीम राबविली.
पोलीस उपायुक्त (वाहतूक, शहर) चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भंडारकर यांच्या नेतृत्त्वात सकाळी ९ पासून मोहिमेला सुरुवात केली. यादरम्यान वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात आले. दुपारी २ पर्यंत १०० गाड्यांवर मोटर वाहन कायद्याचे कलम १०० (२) नुसार कारवाई करण्यात आली. यासह घटनास्थळी अनेक कारच्या काळ्या फिल्म काढण्यात आल्या. कारवाईत एएसआय अन्ना तायडे, राजमोहन सिंह, योगेश बागडे, संतोष पांडे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.
पुणे-मुंबईत चालान झालेल्या वाहनांकडून दंड वसुली
पोलीस निरीक्षक भंडारकर यांनी सांगितले की, तपासणी मोहिमेदरम्यान पुणे आणि मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारी अनेक वाहने नागपुरात धावत आहेत. तपासणीदरम्यान ती आढळून आली. अशा वाहनचालकांनी वर्षापासून दंड भरलेला नव्हता. कारचा नंबर अॅपवर टाकून जुन्या प्रलंबित चालानची रक्कम वसूल करण्यात आली. नागपुरात धावत असलेल्या मुंबईच्या एका कारवर ५ हजार ६०० रुपये दंड प्रलंबित होता.