Pokelen broke the old part of the Poonam Inox Mall | पोकलेनने पूनम आयनॉक्स मॉलचा जीर्ण भाग तोडला
पोकलेनने पूनम आयनॉक्स मॉलचा जीर्ण भाग तोडला

ठळक मुद्देमनपाची दुसऱ्या दिवशीही कारवाई : मंगळवारी कारवाई सुरू राहणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने सोमवारी पोकलेनचा वापर करून वर्धमाननगर येथील पूनम आयनॉक्स मॉलचा जीर्ण भाग तोडला. जीर्ण भाग तोडताना दुर्घटना होऊ नये यासाठी आधी जीर्ण भाग दोराने बांधल्यानंतर पोकलेनच्या साह्याने तो खाली पाडण्यात आला.
जीर्ण भाग तोडण्यास पथकाने सोमवारी सुरुवात केली. इमारतीची उंची अधिक असल्याने पथकाने सोमवारी अग्निशमन विभागाच्या टीटीएल मशीनचा वापर करण्यात आला. जीर्ण बीम व भिंत पाडण्यात आली होती. मॉलच्या मागील बाजूचा भाग जीर्ण झाल्याने तो पाडताना विशेष खबरदारी घेण्यात आली, अशी माहिती सहायक आयुक्त विजय हुमणे यांनी दिली. जीर्ण भाग तोडण्याचे काम सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० दरम्यान करण्यात आले. यासाठी पोकलेन व टर्न टेबलची मदत घेण्यात आली. जीर्ण भाग तोडण्याची कारवाई मंगळवारी पुन्हा सकाळी ११ वाजता सुरू होईल. मागील बाजूचा भाग तोडल्यानंतर समोरचा भाग पाडला जाणार आहे.
गेल्या शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या दुर्घटनेनंतर शनिवारी महापालिका प्रशासनाने मॉल व्यवस्थापनाला नोटीस बजावून जीर्ण भाग २४ तासात तोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवारी सकाळी ११ च्या सुमारास प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांच्या नेतृत्वात मॉलचा जीर्ण भाग तोडण्यास सुरुवात करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने लकडगंज पोलिसांनी आयनॉक्स मॉलच्या परिसरातील रस्त्यावरील वाहतूक बंद केली होती.

स्ट्रक्चरल ऑडिट करणार
पूनम आयनॉक्स मॉलच्या जीर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार असल्याची माहिती विजय हुमणे यांनी दिली. कार्यकारी अभियंता चंद्रकांत गभणे, सहायक आयुक्त अशोक पाटील, अधीक्षक संजय कांबळे, झोनचे उपअभियंता मंगेश गेडाम उपस्थित होते तसेच अग्निशमन विभागाचे पथक तैनात करण्यात आले होते.

Web Title: Pokelen broke the old part of the Poonam Inox Mall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.