चिमुकल्यांच्या कुंचल्यातून साकारले बाबांचे काव्यविश्व
By Admin | Updated: December 22, 2014 00:40 IST2014-12-22T00:40:27+5:302014-12-22T00:40:27+5:30
बाबा आमटेंच्या कठीण कविता. त्या कविता चित्रबद्ध करणे एखाद्या मोठ्या चित्रकाराला कठीण बाब नाही. परंतु या कविता चिमुकल्यांनी चित्रबद्ध करणे म्हणजे त्यांच्या बाल प्रतिभेचा अन् कल्पनाशक्तीचा

चिमुकल्यांच्या कुंचल्यातून साकारले बाबांचे काव्यविश्व
नागपूर : बाबा आमटेंच्या कठीण कविता. त्या कविता चित्रबद्ध करणे एखाद्या मोठ्या चित्रकाराला कठीण बाब नाही. परंतु या कविता चिमुकल्यांनी चित्रबद्ध करणे म्हणजे त्यांच्या बाल प्रतिभेचा अन् कल्पनाशक्तीचा मोठाच अविष्कार म्हणावा लागेल.
आनंदवनचे संस्थापक स्व. बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून बालचित्रकारांचा बसोली ग्रुप आणि फॅबेर कॅसल यांच्या संयुक्त विद्यमाने कॅनव्हास चित्रीकरणाच्या कला शाळेचे आयोजन लक्ष्मीनगरच्या सिस्फाच्या गॅलरीत करण्यात आले. यात बसोलीच्या ९ ते १४ वयोगटातील ८० विद्यार्थ्यांना सिस्फाचे अधिष्ठाता चंद्रकांत चन्ने यांनी बाबा आमटेंच्या ज्वाला आणि फुले या दीर्घ काव्यसंग्रहातील १८ दीर्घ कविता तुकडे करून देण्यात आल्या. या कवितातील ओळीचा आशय लक्षात घेऊन त्यावर चिमुकल्यांना चित्र काढण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला दोन दिवस चिमुकल्यांनी साध्या कागदावर चित्र रेखाटले. रविवारी या मुलांनी कॅनव्हॉसवर चित्र काढण्यास सुरुवात केली. आपली प्रतिभा आणि कल्पनाशक्तीला वाव देत चिमुकल्यांनी कॅनव्हासवर चित्र साकारून बाबा आमटेंच्या दुर्बोध वाटणाऱ्या कविता सिस्फाच्या गॅलरीत चित्रबद्ध करून जिवंत केल्या. चिमुकल्यांनी मी जवाहरलाल, गांधी, पंखांना क्षितीज नसते, शतकांचे शुक्र या कविता दृश्यमय केल्या. रंगरेषा, आकार, स्वभाव आणि वैशिष्टपूर्ण आशय या सर्व बाबीमुळे सिस्फाच्या गॅलरीचा परिसर फुलून गेला. जानेवारी महिन्यात चिमुकल्यांनी साकारलेले चित्र सिस्फाच्या गॅलरीत प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. कार्यशाळेच्या शुभारंभप्रसंगी आनंदवनच्या कला विभागाचे प्रमुख प्रल्हाद ठग, सिस्फाचे अधिष्ठाता चंद्रकांत चन्ने, फॅबेर कॅसलचे प्रादेशिक व्यवस्थापक सुहास भिडे उपस्थित होते.
कार्यशाळेच्या सुरुवातीला बसोलीच्या बाल चित्रकारांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या गोळीबारात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांना मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली अर्पण केली. (प्रतिनिधी)