नागपुरात पीएनबीला ९ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:21 IST2018-02-24T00:21:28+5:302018-02-24T00:21:42+5:30
बनावट कागदपत्रे सादर करून नऊ लाख रुपयांचे वाहन कर्ज उचलून बँकेची फसवणूक करणाऱ्या एका टोळीविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

नागपुरात पीएनबीला ९ लाखांचा गंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट कागदपत्रे सादर करून नऊ लाख रुपयांचे वाहन कर्ज उचलून बँकेची फसवणूक करणाऱ्या एका टोळीविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
माधव सुभाष बाबलसरे, दीपक नत्थुजी इंगळे, तुषार रमेश पाटणे, संजय सुभाष बाबलसरे, सुभाष बाबलसरे, महेश तांदेकर अशी या टोळीतील आरोपींची नावे आहेत. त्यांनी त्यांच्या अन्य साथीदारांच्या मदतीने संगनमत करून २६ एप्रिल २०१४ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत पंजाब नॅशनल बँकेच्या सेमिनरी हिल्स (गिट्टीखदान) शाखेतून वाहन विकत घेण्यासाठी नऊ लाखाचे कर्ज उचलले. त्यासाठी त्यांनी बँकेला बनावट कागदपत्रे सादर केली. रक्कम उचलल्यानंतर त्यांनी बँकेने ठरवून दिलेले हप्ते भरण्याचे टाळले. थकीत कर्जाची चौकशी झाल्यानंतर उपरोक्त आरोपींची बनवाबनवी उजेडात आली. त्यांच्या फसवणुकीची तक्रार बँक व्यवस्थापक ज्ञानदेव शामरावजी निमजे (वय ६५ रा. सीआरपीएफ कॅम्प, हिंगणा) यांनी गिट्टीखदान ठाण्यात नोंदविली. चौकशीनंतर पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.