नागपुरातील कोराडी भागात भूखंडाच्या वादातून तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 23:12 IST2018-06-26T23:09:45+5:302018-06-26T23:12:46+5:30
भूखंडावर केलेल्या अतिक्रमणाचा वाद चिघळला आणि भांडणाला सुरुवात झाली. त्यातच सात जणांनी तरुणास लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यात तरुणासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून, त्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कोराडी (ता. कामठी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मसाळा येथे सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. यात पोलिसांनी सात आरोपींपैकी तिघांना अटक केली आहे.

नागपुरातील कोराडी भागात भूखंडाच्या वादातून तरुणाचा खून
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भूखंडावर केलेल्या अतिक्रमणाचा वाद चिघळला आणि भांडणाला सुरुवात झाली. त्यातच सात जणांनी तरुणास लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यात तरुणासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून, त्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कोराडी (ता. कामठी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मसाळा येथे सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. यात पोलिसांनी सात आरोपींपैकी तिघांना अटक केली आहे.
मंगेश आबाजी भोयर (३५, रा. मसाळा, ता. कामठी) असे मृताचे नाव असून, मोहन कारोकार, विनोद कानबा कारोकार (२५), वासुदेव कानबा कारोकार, मंगेश कारोकार, दादू कारोकार, लकीसिंग रणजितसिंग सिंदुरिया व प्रवीण डबले, सर्व रा. मसाळा, ता. कामठी अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी विनोद कारोकार, वासुदेव कारोकार व लकीसिंग सिंदुरिया या तिघांना अटक केली. जखमींमध्ये आबाजी भोयर व तनबाजी कारोकार यांचा समावेश आहे. आरोपी विनोदचे वडील कानबा कारोकार यांचा मसाळा येथे भूखंड असून, त्या भूखंडावर मृत मंगेशचे वडील आबाजी भोयर यांनी अतिक्रमण केले. यासंदर्भात स्थानिक ग्रामपंचायतकडे तक्रार करण्यात आली. ग्रामपंचायतने सदर अतिक्रमण हटविण्यासाठी आबाजी भोयर यांना नोटीस बजावली. मात्र, त्यांनी अतिक्रमण हटविले नाही.
दरम्यान, याच कारणावरून विनोद, त्याचा भाऊ वासुदेव व अन्य पाच जणांनी सोमवारी सकाळी मंगेशला गाठले आणि त्याला याबाबत विचारणा केली. वाद चिघळल्याने या सातही जणांनी मंगेश, त्याचे वडील आबाजी व तनबाजी कारोकार यांना लोखंडी रॉड व काठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यात तिघांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नागपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे मंगेशचा सोमवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अन्य दोघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी भादंवि ३०२, ३२६, १४७, १४८, १४९, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शिवाय, कारोकार यांच्या तक्रारीवरून आबाजी भोयर यांच्याविरुद्ध अतिक्रमणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सात दिवसांची पोलीस कोठडी
या प्रकरणात पोलिसांनी विनोद कारोकार, वासुदेव कारोकार व लकीसिंग सिंदुरिया या तिघांना मंगळवारी सकाळी अटक केली. त्यांना नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने या तिन्ही आरोपींना सात दिवसांची अर्थात सोमवारपर्यंत (दि. २ जुलै) पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे, या घटनेतील अन्य चार आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.