सुरेश फलके
लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : नागपूर शहरालगत असलेली वाडी ही जिल्ह्यात माेठी व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली नगर परिषद आहे. मात्र, येथील स्मशानभूमीची अवस्था तेवढीच दयनीय झाली आहे. या स्मशानभूमीतील दहन शेडचे छप्पर गायब असून, खुर्च्याही तुटलेल्या असल्याने नागरिकांची गैरसाेय हाेते. शिवाय, संपूर्ण आवारात घाण व कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
शहरातील विविध समस्या साेडविण्याबाबत स्थानिक लाेकप्रतिनिधी गंभीर नसतात, असा आराेप नागरिकांनी केला आहे. पालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक ताेंडावर आली असताना शहरातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या सांडपाण्याची भूमिगत नाली, डम्पिंग यार्ड, अतिक्रमण, स्मशानभूमीची दुरवस्था या समस्या साेडविण्यात पालिका प्रशासनाला अद्याप यश आले नाही.
वाडी शहराची लाेकसंख्या एक लाखाच्या वर असून, अंत्यसंस्कारासाठी शहरात दाेन स्मशानभूमी आहेत. टेकडी वाडी येथील स्मशानभूमीत चार दहन शेड तयार करण्यात आले आहेत. यातील एकाचे शेड पूर्णपणे गायब असून, दाेन ओट्यांवरील छत पूर्णपणे तुटल्याने निकामी झाले आहेत. येथे येणाऱ्यांना विश्रांती घेता यावी म्हणून सिमेंटच्या खुर्च्या लावल्या हाेत्या. त्या तुटल्याने विश्रांती घेण्यासाठी बसावे कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडताे.
स्मशानभूमीच्या आवाराची नियमित साफसफाई केली जात नसल्याने आवारात कचरा व घाण पसरली आहे. या स्मशानभूमीत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना विविध अडचणींना सामाेरे जावे लागते. या समस्या साेडविण्याची पालिका प्रशासनाकडे अनेकदा मागणी करण्यात आली. परंतु, काेरड्या आश्वासनाशिवाय नागरिकांच्या पदरात काहीही पडले नाही.
...
नागरिकांचा अपेक्षाभंग
वाडी ग्रामपंचायतचे नगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर शासनाकडून पुरेसा निधी प्राप्त हाेणार असल्याने येथील मूलभूत समस्या मार्गी लागतील,अशी स्थानिक नागरिकांना अपेक्षा हाेती. या पाच वर्षांत शहरातील बाेटावर माेजण्याइतक्या समस्या साेडविण्यात आल्या असून, अनेक मूलभूत समस्या ‘जैसे थे’च आहेत. स्थानिक लाेकप्रतिनिधी स्वार्थी राजकारणापलीकडे विचार करीत नसल्याने वाडी शहर समस्याचे माहेरघर बनले आहे. त्यातूनच अपेक्षाभंग झाल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
...
साैंदर्यीकरण रखडले
काही वर्षांपूर्वी या स्मशानभूमीच्या साैंदर्यीकरणाचा प्रसताव पालिका प्रशासनाने तयार करून ताे मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला हाेता. त्या प्रस्तावावर अद्यापही निर्णय घेण्यात आला नाही. त्याचा पाठपुरावा करण्याची तसदीही पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक व स्थानिक लाेकप्रतिनिधी घेत नाहीत. या समस्या वेळीच साेडविल्या जात नसल्याने त्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करीत असून, त्याचा त्रास केवळ सामान्य नागरिकांनाच सहन करावा लागताे.