लाडक्या बहिणींचा आकडा तीस लाखावर आणण्याचे प्लॅनिंग: विजय वडेट्टीवार
By कमलेश वानखेडे | Updated: February 6, 2025 19:25 IST2025-02-06T19:25:24+5:302025-02-06T19:25:24+5:30
शिवभोजन थाळी योजना बंद करू नका; विजय वडेट्टीवार यांची मागणी

लाडक्या बहिणींचा आकडा तीस लाखावर आणण्याचे प्लॅनिंग: विजय वडेट्टीवार
कमलेश वानखेडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी ही योजना आणली होती. पण आता लाडकी बहीण योजनेचे कारण दाखवून ही योजना बंद करणार असल्याची चर्चा आहे. गरजू आणि गरीब जनतेसाठी असलेली ही योजना बंद करू नये, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
नागपुरात गुरुवारी पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, शिवभोजन थाळी या योजनेमुळे सामान्य जनतेला दहा रुपयात चांगले अन्न मिळते. लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातीवर एकीकडे सरकार पैसे उधळते आणि गरीब जनतेसाठी असलेली शिवभोजन थाळी योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हे अन्यायकारक आहे. त्यामुळे ही योजना सुरू ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली.
सहा महिन्यापासून आरोग्याचे पैसे दिले जात नाही. गडचिरोच्या एका मजुराने आत्महत्या केली. संजय गांधी निराधार योजना, कंत्राटदार, अंगणवाडी सेविका यांचे पैसे मिळत नाही. मत घेऊन खुर्ची उबवत आहे. उद्या अनेक जाचक अटी लावून काढतील. संजय गांधी योजनेचा लाभ काढला आहे. लाडक्या बहिणीचा अडीच कोटी पर्यंत गेलेला आकडा पंचवीस ते तीस लाखावर आणण्याचे प्लॅनिंग सुरू आहे. जाहिराती देऊन लाडक्या बहिणींची दिशाभूल करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान घेण्याचा हा फंडा आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.
सर्व सोयाबीन खरेदी करा, अन्यथा आंदोलन
- सोयाबीन खरेदीचा आजचा शेवटचा दिवस आहे. बाजारात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडून सोयाबीन खरेदीचा कोटा वाढवून घ्यावा, शेतकऱ्यांकडे जितका सोयाबीन आहे तो खरेदी करावा. सरकारने सोयाबीन शेतकऱ्यानं दिलासा दिला नाही तर यवतमाळ इथे शेतकऱ्यांबरोबर आंदोलन करू आणि सगळा सोयाबीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ठेवू, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.
सरकारची इभ्रत वाचवायची असेल मुंडेंचा राजीनामा घ्या
- धनंजय मुंडे हे कृषी विभागाचे मंत्री असताना त्यांच्या खात्यात घोटाळे झाले. त्यावेळीं आयुक्तांची आणि सचिवांची बदली झाली होती. आता देखील विविध आरोप होत असताना धनंजय मुंडे यांचा राजीनामा सरकार का घेत नाही, इतकी या सरकारची काय मजबुरी आहे, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. महायुती सरकारची इभ्रत वाचवायची असेल तर मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, असेही वडेट्टीवार म्हणाले.