आंबेडकर रुग्णालयात १५ वर्षानंतर शस्त्रक्रियेचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:07 IST2020-12-02T04:07:41+5:302020-12-02T04:07:41+5:30
नागपूर : उत्तर नागपूरच नव्हे तर ग्रामीण रुग्णांनाही तातडीने रुग्णसेवा मिळावी, या दृष्टीने कामठी रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ...

आंबेडकर रुग्णालयात १५ वर्षानंतर शस्त्रक्रियेचे नियोजन
नागपूर : उत्तर नागपूरच नव्हे तर ग्रामीण रुग्णांनाही तातडीने रुग्णसेवा मिळावी, या दृष्टीने कामठी रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राची स्थापना करण्यात आली. परंतु १५ वर्षे उलटूनही हे रुग्णालय बाह्यरुग्ण विभागापुरतेच (ओपीडी) मर्यादित आहे. यातही अनेक विभागातील डॉक्टरांच्या जागा रिक्त असल्याने आलेल्या रुग्णाला मेयोत पाठविणे एवढेच ‘उपचार’ सुरू होते. याची दखल पालकमंत्र्यांनी घेतली. यामुळे जागा भरण्यापासून ते आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे, डोळ्यांच्या शस्त्रक्रियेतून रुग्णालयाच्या शस्त्रक्रियांना सुरुवात होणार आहे.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत(डीएमईआर)इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या(मेयो)देखरेखेखाली १५ ऑगस्ट २००५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे कार्य औषधवैद्यकशास्त्र विभाग (मेडिसीन), शल्यचिकित्सा विभाग (सर्जरी), अस्थिव्यंगोपचार विभाग (ऑर्थाेपेडिक), स्त्रीरोग व प्रसूती विभाग, बालरोग विभाग, नेत्ररोग विभाग पॅथालॉजी व रेडिओलॉजी विभागातून सुरू झाले. दुसऱ्या टप्प्यात आपात्कालीन विभाग तर तिसऱ्या टप्प्यात मेडिसीन, शल्यचिकित्सा, ऑर्थाेपेडिक, गायनिक, बालरोग व नेत्ररोग विभागाचे वॉर्ड तयार होणार होते. परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाने या रुग्णालयाकडे विशेष लक्ष दिले नाही. तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने रुग्णांनी या रुग्णालयाकडे पाठ फिरविली होती. पालकमंत्री राऊत यांनी या रुग्णालयाचा आढावा घेत मेयोचे अधीक्षक डॉ. रवी चव्हाण यांना पूर्ण क्षमतेने आंबेडकर रुग्णालयाची ओपीडी सुरू करण्याचा सूचना केल्या. त्यानुसार पुढील आठ दिवसात या रुग्णालयात बराच बदल होण्याचे संकेत मिळाले आहे.
- सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा प्रस्ताव मंत्रिमंडळात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे रूपांतर ५६८ खाटाच्या अतिविशेषोपचार (सुपर स्पेशालिटी) रुग्णालयात होणार होते. यात १७ नवीन पदव्युत्तर व सात अतिविशेषोपचार अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने ४ मार्च २०१४ मध्ये घेतला होता. परंतु नंतर कुणी याचा पाठपुरावा केला नाही. आता तब्बल सहा वर्षांनी पुन्हा या केंद्राचा सुधारित प्रस्ताव मंत्रिमंडळात पाठविण्यात आला आहे.
- नेत्रासोबतच ऑर्थाेचीही ओटी सुरू होणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह सज्ज केले जात आहे. याला महिनाभराचा वेळ लागेल. त्यानंतर नेत्र शस्त्रक्रियेला सुरुवात होईल. याशिवाय, ऑर्थाेपेडिक विभागाच्या शस्त्रक्रिया होतील. पुढील आठ दिवसात सर्व रिक्त जागा भरल्या जातील.
-डॉ. रवी चव्हाण
वैद्यकीय अधीक्षक, मेयो