Pistol confiscated from notorious criminal in Nagpur | नागपुरात अट्टल गुन्हेगाराकडून पिस्तुल जप्त

नागपुरात अट्टल गुन्हेगाराकडून पिस्तुल जप्त

ठळक मुद्देमुलीची काढली छेड, जमावाकडून धुलाई : गिट्टीखदान पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका मुलीला ओढून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन करणाऱ्याअट्टल गुन्हेगाराला संतप्त जमावाने पकडले आणि त्याची बेदम धुलाई केली. नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याची चौकशी करून त्याच्याकडून एक पिस्तुल तसेच रोख आणि दागिन्यांसह घरफोडीचे साहित्य जप्त केले. नीलेश सुधाकर पुरुषोत्तमवार (वय २८) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. तो बल्लारपूर (जि. चंद्रपूर) येथील रहिवासी आहे. 


बुधवारी सकाळी गिट्टीखदानमधील पीडित मुलगी मॉर्निंग वॉक करीत असताना आरोपी नीलेश मागून आला. त्याने तिचे तोंड दाबून टी शर्ट ओढले आणि तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. मुलीने प्रतिकार केल्याने तो पळून गेला. घरी जाऊन मुलीने आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर ती आरोपीला शोधण्यासाठी बाहेर पडली. तिला काही अंतरावर आरोपी नीलेश दिला. मुलीला पाहून आरोपी आपली अ‍ॅक्टीव्हा सोडून पळून गेला. मुलीने प्रसंगावधान राखत आरोपीची अ‍ॅक्टीव्हा आपल्या घरी नेली. त्यामुळे नीलेश तिच्या घरी पोहचला. त्याने मुलीसोबतच तिच्या आईशी वाद घातला आणि त्यांना मारहाण केली. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यांनी नीलेशला पकडून त्याची बेदम धुलाई केली. नंतर गिट्टीखदान पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी आरोपी नीलेशला अटक करून चौकशी केली असता तो मूळचा बल्लारपूर येथील रहिवासी असल्याचे आणि सध्या गोधनी मानकापूरच्या स्वामीनगरात राहात असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या रूमची तपासणी केली असता त्याच्याकडे एक विदेशी बनावटीचे पिस्तुल, १० जिवंत काडतूस, ११, ३०० रुपये आणि सोन्याचांदीचे दागिने आढळले. त्याच्यावर नागपूरसह चंद्रपूर जिल्ह्यातही गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असून, पोलीस उपायुक्त विनीता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुनील गांगुर्डे आणि त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Pistol confiscated from notorious criminal in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.