पाईपलाईन अर्धवट, टॅंकरसंख्या अर्ध्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:52 IST2021-02-05T04:52:54+5:302021-02-05T04:52:54+5:30

नागपूर : नागपुरातील सीमावर्ती भागामध्ये अद्यापही पाईपलाईन पोहोचलेली नाही. लक्षावधी संख्येतील या नागरिकांना टॅंकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागतो. असे ...

Pipeline halved, tanker halves halved | पाईपलाईन अर्धवट, टॅंकरसंख्या अर्ध्यावरच

पाईपलाईन अर्धवट, टॅंकरसंख्या अर्ध्यावरच

नागपूर : नागपुरातील सीमावर्ती भागामध्ये अद्यापही पाईपलाईन पोहोचलेली नाही. लक्षावधी संख्येतील या नागरिकांना टॅंकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागतो. असे असतानाही केवळ तिजोरीच्या चिंतेमुळे महानगरपालिका काही टॅंकरांच्या संख्येत कपात करण्याच्या मन:स्थितीत आहे. पाईपलाईनचे नेटवर्क नसणाऱ्या अशा भागातील टॅंकरची संख्या घटवून ती १५० वर आणण्याची योजना आखली जात असल्याची माहिती आहे. वर्षभरापूर्वी या क्षेत्रातील टॅंकरची संख्या ३३० होती, हे विशेष !

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका दमातच ११८ टॅंकरची कपात केली होती. सध्या २१० च्या जवळपास टॅंकर सुरू आहेत. अलीकडेच मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने १९५ टॅंकरसाठी निविदा मागविली आहे. संचालकांंनी ३२४ च्या जवळपास टॅंकर्सच्या निविदा भरल्या आहेत. मात्र, टॅंकरची स्थिती लक्षात घेता १५० टॅंकर्स निवडले जातील. ४५ टॅंकर्स आरक्षित ठेवले जातील, अशी माहिती आहे. यावरून, येत्या उन्हाळ्यात या परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी ओरड होणार, असेच दिसत आहे.

मनपातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाईपलाईचे जाळे पसरविले जात असल्याने टॅंकरच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. मात्र, ६० टक्क्यांपेक्षा अधिक भागातील पाईपलाईन चार्ज होऊ शकली नाही, ही वस्तुस्थिती आहे.

...

अमृत योजनेतून २५० किमीची पाईपलाईन

अमृत योजनेच्या माध्यमातून नागपूर शहरामध्ये २५० किलोमीटर लांबीची पाईपलाईन नव्याने पसरविण्यात आली आहे. मात्र, ४४ टाक्यांपैकी आतापर्यंत २२ टाक्यांचेच काम सुरू झाले आहे. यातील १७ पैकी १२ टाक्यांसाठी जागा शोधल्याचा दावा मनपाचे अधिकारी करीत आहेत. उर्वरित टाक्यांसाठी जागाच निश्चित झालेली नाही. टाक्या उभारल्या नसतानाही पाईपलाईन पसरवून फायदा नाही, हे स्पष्ट आहे. लकडगंज झोनमध्ये ३५ टॅंकर घटविण्यात आले आहेत. पाण्याच्या टाक्या इंटरकनेक्ट करण्याचे काम सुरू आहे. दाभा, सुगतनगर, आसीनगर, वांजरा या ठिकाणीही टॅंकर कपात करण्यात आली आहे.

...

कोणालाही त्रास होऊ देणार नाही : झळके

स्थायी समिती अध्यक्ष व पाणीपुरवठा सभापती विजय झळके यांनी टॅंकर कपातीमुळे कुणीही व्यक्ती प्रभावित होणार नाही, असा शब्द दिला आहे. मनमानीपणाने टॅंकर कमी करायचे नाही, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. अमृत योजनेतून २५० किलोमीटरची पाईपलाईन टाकली आहे, अनेक भागात चार्ज होऊनही नागरिकांनी नळाच्या जोडण्या घेतलेल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले.

...

टॅंकरवर अवलंबून असलेले परिसर

धरमपेठ झोन : दाभा, वाडी, हजारी पहाड, चिंतामणीनगर.

हनुमाननगर झोन : चिंतेश्वर झोपडपट्टी, मांग भगवतीनगर, मेहरबाबानगर, वैष्णव मातानगर, श्रीकृष्णनगर, अभिजितनगर, दौलतनगर, तांडेकर लेआऊट, मंगलदीपनगर, मुद्रानगर, कैकाडेनगर झोपडपट्टी, महापुष्पनगर.

नेहरूनगर झोन : जयजलाराम नगर, भवानी नगर सोसायटी, श्रीरामनगर झोपडपट्टी, शिव छत्रपती सोसायटी, नागपूर सोसायटी, शिवम सोसायटी, नराने लेआऊट.

सतरंजीपुरा झोन : मौजा कळमना, वांजरा.

लकड़गंज झोन : विजयनगर, नवकन्यानगर, धरमनगर, भोलेनगर, अंतुजीनगर, अब्बुमियानगर, तुलसीनगर, दुर्गानगर, भरतवाडा लेआऊट आदी.

आसीनगर झोन : वांजरा वस्ती, मुरलीधर सोसायटी, समतानगर, रंजना सोसायटी, रोहिणी सोसायटी, धम्मदीपनगर, पाहुणे लेआऊट, एकतानगर, भीमवाडी, शिवनगर, आदी.

Web Title: Pipeline halved, tanker halves halved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.