शारीरिक श्रम मनाची संवेदना वाढवते- बी. वेंकटेसरलू
By Admin | Updated: September 21, 2014 01:34 IST2014-09-21T01:33:19+5:302014-09-21T01:34:16+5:30
अकोला येथील कृषी विद्यापीठाच्या युवा महोत्सवाला जल्लोषात सुरुवात.

शारीरिक श्रम मनाची संवेदना वाढवते- बी. वेंकटेसरलू
अकोला : अलीकडे युवा वर्गात अनेक व्याधी वाढल्याचे दिसत असून, १८ ते २0 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये अस्थी घनता कमी होत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी शारीरिक श्रम घेतले तर व्याधी कमी होईल आणि मनाची संवेदना वाढेल. युवा महोत्सवाच्या माध्यमातून शारीरिक क्षमता वाढते आणि मनाचा विकास होतो, असे प्रतिपादन स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटेसरलू यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या डॉ. के.आर. ठाकरे सभागृहात आयोजित युवा महत्सोवाचे उद्घाटन शनिवारी डॉ. वेंकटेसरलू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते विद्यार्थ्यांना उद्देशून बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. वंदन मोहोड, प्रा. संजय कोकाटे, युवा महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.एस.के. अहेरकर, डॉ. एस.एम. टाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी डॉ. वेंकटसरलू यांनी डॉ. हरवीरसिंग या कृषी शास्त्रज्ञांचा उल्लेख केला. हरवीरसिंग यांची मुलगी सायना नेहवाल हिने क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळविले आहे. शारीरिक श्रमामुळे यश प्राप्त करता येते, ही प्रेरणा सायनाने आपल्यासमोर निर्माण केली आहे. यासाठी शारीरिक श्रम आणि मनाची संवेदना वृद्धिंगत करावी लागणार असल्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी युवा महोत्सव पुस्तिकेचे प्रकाशन व येथे आयोजित पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालक डॉ. बिडवे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. उ पेंद्र कुळकर्णी यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर केले. विद्यार्थी मोठय़ा सं ख्येने उपस्थित होते.