तीन मित्रांना निर्जन स्थळावरचे फोटोशूट चांगलेच महागात पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 20:27 IST2021-12-17T20:25:06+5:302021-12-17T20:27:17+5:30
Nagpur News बेलतरोडी परिसरात निर्जन ठिकाणी जाऊन फोटोशूट करणे तीन युवकांना चांगलेच महागात पडले. तेथे आलेल्या तीन सशस्त्र लुटारूंनी त्या युवकांना मारहाण करून त्यांच्याजवळचा कॅमेरा तसेच मोबाइल हिसकावून नेला.

तीन मित्रांना निर्जन स्थळावरचे फोटोशूट चांगलेच महागात पडले
नागपूर : बेलतरोडी परिसरात निर्जन ठिकाणी जाऊन फोटोशूट करणे तीन युवकांना चांगलेच महागात पडले. तेथे आलेल्या तीन सशस्त्र लुटारूंनी त्या युवकांना मारहाण करून त्यांच्याजवळचा कॅमेरा तसेच मोबाइल हिसकावून नेला. गुरुवारी सायंकाळी ५.३० ते ६ च्या सुमारास ही घटना घडली.
कैकाडेनगर झोपडपट्टीजवळच्या महाजन लेआऊटमध्ये राहणारा गजानन प्रेमसिंग साहू (वय १७) आणि त्याचे दोन मित्र बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेळा हरी परिसरात गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास गेले. तेथे पुलाजवळ ते कॅमेऱ्याने एकमेकांचे फोटो काढत असताना दुचाकीवर तीन सशस्त्र भामटे आले. त्यांनी फोटोशूट करणाऱ्या युवकांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याजवळचे मोबाइल तसेच कॅमेरासह २६,५०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. युवकांना मारहाण करून आरोपी पळून गेले. साहू आणि त्याच्या मित्रांनी बेलतरोडी ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदवली. पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
-----