यादीत मतदारांचे छायाचित्र अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:14 IST2021-02-18T04:14:33+5:302021-02-18T04:14:33+5:30
वाडी : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी तपासणी (शुद्धीकरण) कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यानुसार केंद्रस्तरीय मतदान अधिकारी ...

यादीत मतदारांचे छायाचित्र अनिवार्य
वाडी : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी तपासणी (शुद्धीकरण) कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यानुसार केंद्रस्तरीय मतदान अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत नागपूर ग्रामीण तालुक्यात कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात मतदार यादीमधील दुबार मतदारांची नावे शोधणे, मृत मतदारांची यादी बनविणे तसेच यादीमध्ये नाव आहे पण छायाचित्र नाही अशा मतदाराकडून फोटो गोळा करणे किंवा मतदारांनी स्वत: आपले फोटो तहसील कार्यालयाच्या निवडणूक शाखेत जमा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. वरील कार्यक्रमाच्या अनुषंगाने नागपूर ग्रामीणचे तहसीलदार मोहन टिकले, नायब तहसीलदार नितीन धापसे पाटील, मोनाली सोनवणे, निवडणूक शाखेचे कारकून ईश्वर बुधे, मंडळ अधिकारी, तलाठी व केंद्रस्तरीय मतदान अधिकाऱ्यांनी कृती आरखडा निश्चित केला आहे. यानुसार मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या घरी केंद्रस्तरीय अधिकारी भेट देणार आहेत. यात सदर मतदार त्या पत्त्यावर राहत आहेत किंवा नाही याची चौकशी केली जाणार आहे. नवीन नियमानुसार मतदार यादीत मतदाराचे छायाचित्र असणे आवश्यक आहे. मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदाराचे नाव यादीतुन वगळले जाईल. नागपूर (ग्रामीण) तालुक्यात काटोल विधानसभा मतदार संघात एकूण १८ मतदान केंद्र, हिंगणा विधानसभा मतदार संघातील २०४ मतदान केंद्र तसेच कामठी विधानसभा मतदार संघातील एकूण १४१ मतदान केंद्र मोडतात.